बिग बॉस फेम अभिनेत्री जास्मीन भसीन (Jasmin Bhasin) अनेक कारणांमुळे चर्चेत असते. 'नागिन', 'दिल से दिल तक' या मालिकांमध्ये दिसली आहे. सध्या ती पंजाबी सिनेमांमध्ये अॅक्टिव्ह आहे. जास्मीनला करिअरच्या सुरुवातीलाच कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. तिच्यासोबत एक भयानक घटना घडली होती जी ती आजपर्यंत विसरु शकलेली नाही. एका दिग्दर्शकाने हॉटेल रुममध्ये लॉक करुन तिच्यासोबत बळजबरी केली होती असा तिने खुलासा केला आहे.
नुकतंच एका मुलाखतीत जास्मीन भसीन म्हणाली, "एक दिवस मला दिग्दर्शकाने जुहू येथील एका हॉटेलमध्ये ऑडिशनसाठी बोलवलं होतं. लॉबीमध्ये इतरही काही अभिनेत्री आणि मुली बसल्या होत्या. कोऑर्डिनेटर्सही होते. जेव्हा माझी वेळ आली तेव्हा मला खोलीत एक माणूस दारु पिताना दिसला. तो मला सीन करायला सांगत होता. कोऑर्डिनेटरही खोलीतून बाहेर निघून गेला."
ती पुढे म्हणाली, "मी खूप घाबरले. ते मला म्हणाले की सीन आताच करुन दाखव. मी त्यांना म्हटलं मी उद्या तयार होऊन येते. पण तो आताच कर म्हणत मला बळजबरी करु लागला. सीन असा होता की तुमचा प्रेमी जात आहे आणि त्याला थांबवायचं आहे. मी सीन केला तर तो म्हणाले, 'असं नाही' . त्याने खोलीचा दरवाजा बंद केला आणि माझ्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करु लागला. माझ्यात कशीतरी हिंमत आली आणि मी तिथून पळ काढला. त्या दिवसापासून मी ठरवलं की आयुष्यात कधीच कोणत्याही हॉटेल रुममध्ये मीटिंगसाठी किंवा ऑडिशनसाठी जाणार नाही."
जास्मीन भसीनने 'अर्दास सरबत दे भले दी','वॉर्निंग २','बदनाम' या पंजाबी सिनेमांमध्ये दिसले आहेत. नुकतीच ती 'द ट्रेटर्स' रिएलिटी शोमध्ये दिसली.