Join us

बॉलीवूडमध्ये ‘जय किसान’!

By admin | Updated: August 11, 2016 03:41 IST

भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाच्या विकासात शेती आणि शेती उत्पन्नाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ असा नारासुद्धा दिला होता

भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाच्या विकासात शेती आणि शेती उत्पन्नाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ असा नारासुद्धा दिला होता. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचा शेतकरी हा कणा आहे. दुसरीकडे सिनेमा हा समाजमनाचा आरसा आहे. त्यामुळे समाजाचं प्रतिबिंब हे सिनेमात नेहमी पाहायला मिळतं. त्यामुळेच वेळोवेळी शेतकरी, शेतकऱ्यांच्या समस्या या सिनेमातून मांडल्याचं पाहायला मिळतं. चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी शेतकऱ्यांच्या भूमिका आजवर साकारल्यात. आता याच कलाकारांच्या यादीत अभिनेता हृतिक रोशनचं नावही जोडलं जातंय. आगामी 'मोहेंजो दारो' या सिनेमात अभिनेता हृतिक रोशन शेतकरी बनल्याचं पाहायला मिळणार आहे. 'मोहेंजोदडो' या भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये शेतीला विशेष महत्त्व होतं. त्यामुळे या आगामी सिनेमात हृतिक शेतकरी बनलाय. पहिल्यांदाच हृतिक अशा प्रकारची भूमिका साकारत असला, तरी हिंदी चित्रपटसृष्टीत आजवर अनेक कलाकारांनी शेतकऱ्यांची भूमिका अजरामर केलीय. पाहूया कोणते आहेत हे कलाकार आणि ते सिनेमा.मदर इंडिया : १९५७मध्ये दिग्दर्शक मेहबूब खान यांनी आणलेला 'मदर इंडिया' हा सिनेमा तुफान गाजला. शेतकरी, सावकारी विषयावर या सिनेमातून भाष्य करण्यात आलं होतं. यात नर्गिस, सुनील दत्त, राजेंद्रकुमार, राजकुमार अशा हिंदी चित्रसृष्टीतील दिग्गजांनी शेतकऱ्याची भूमिका साकारली होती. हा सिनेमा असा काही हिट ठरला की त्यानं थेट आॅस्करपर्यंत मजल मारली होती.दो बीगा जमीन : बिमल रॉय यांचा हा सिनेमा. या सिनेमात प्रसिद्ध अभिनेते बलराज साहनी यांनी शेतकऱ्याची भूमिका साकारली होती. सध्याच्या जमान्यात वादात असलेला शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहणाचा मुद्दा त्या काळी या सिनेमातून मांडण्यात आला होता. यातील बलराज साहनी यांची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली होती.उपकार : भारतकुमार अशी ज्यांची ओळख आहे ते अभिनेता म्हणजे मनोजकुमार. त्यांनी उपकार या गाजलेल्या सिनेमात भारत या नावाच्या शेतकऱ्याची भूमिका साकारली होती. तत्कालीन भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान नारा दिला होता. यापासून प्रेरित होऊन मनोजकुमार यांनी उपकार सिनेमामधील शेतकऱ्याची भूमिका साकारली होती.करण अर्जुन : 'करण अर्जुन' या सिनेमातही अभिनेता शाहरूख खान, सलमान शेतकऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते. यातील या दोन्ही कलाकारांनी साकारलेली शेतकऱ्याची भूमिका छोटीशी असली तरी रसिकांना ती भावली होती.लगान : 'लगान' या सिनेमात मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खाननेही शेतकऱ्याची भूमिका साकारली होती. सिनेमाला क्रिकेटची पार्श्वभूमी असली, तरी यातील आमीरनं साकारलेला भुवन हा शेतकरीच होता. हे पात्र शेतकऱ्यासारखं वाटावं यासाठी आमीरनं बरीच मेहनत घेतली होती.किसान : किसान या सिनेमातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करण्यात आलं होतं. यात अभिनेता जॅकी श्रॉफ, अरबाज खान आणि सोहेल खान हे शेतकऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळाले.पीपली लाइव्ह : 'पीपली लाइव्ह' या सिनेमात शेतकरी आत्महत्यासारख्या गंभीर विषयाला वाचा फोडण्यात आली होती. यात रघुवीर यादव आणि ओमकारदास माणेकपुरी यांनी शेतकऱ्याची साकारलेली भूमिका रसिकांना भावली होती.वीर झारा : 'वीर झारा' या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन हेसुद्धा शेतकऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळाले. बिग बींची ही भूमिका छोटीशी असली तरी तितकीच लक्षवेधी होती.'बारोमास' आणि 'प्रोजेक्ट मराठवाडा' या सिनेमातही बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांनी शेतकऱ्याची भूमिका साकारलीय.