अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही महाठग सुकेश चंद्रशेखरच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकली आहे. सुकेशने अनेकवेळा अभिनेत्रीचं नाव घेतलं असून सत्य माहीत असूनही तिने आरोपीकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याचं सांगितलं आहे. आता जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलाचं विधान समोर आलं आहे. कोर्टात त्याने पुन्हा एकदा अभिनेत्री निर्दोष असल्याचं म्हटलं आहे.
अभिनेत्रीवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करता येणार नाही, असं वकिलाने म्हटलं आहे. आर्थिक फायद्यासाठी ती कोणत्याही या चुकीच्या कामात गुंतलेली नव्हती असं सांगितलं. जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयात मनी लाँड्रिंग प्रकरणात तिची बाजू मांडली. जिथे कोर्टाला सांगितलं की, अभिनेत्रीवर सुरू असलेली केस निराधार आहे. या प्रकरणी ईडीने अभिनेत्रीविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ डिसेंबरला होणार आहे.
जॅकलिन फर्नांडिसचे वकील सिद्धार्थ अग्रवाल, प्रशांत पाटील आणि शक्ती पांडे यांनी तिची बाजू मांडली. तर जोहेब हुसेन हे ईडीच्या वतीने हजर होते. अभिनेत्रीच्या वकिलाने सांगितलं की, जर कोणी पैशाच्या लालसेपोटी गुन्हेगारी कृत्यांमध्ये गुंतले असेल, तर त्याच्याविरुद्ध हा खटला चालवला जाऊ शकतो. पण जॅकलीन फर्नांडिसने असा कोणताही फायदा घेतलेला नाही किंवा ती त्याचा भागही नव्हती.
जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलाने असंही म्हटलं की, अभिनेत्रीला सुकेश चंद्रशेखरचं सत्य माहीत नव्हतं, तिला काहीच माहीत नव्हतं. आपल्याला दिलेल्या भेटवस्तू या चुकीच्या पद्धतीने कमावलेल्या पैशाने विकत घेतल्याचं तिला माहीत नव्हतं. अभिनेत्रीला सुकेशची क्राईम कुंडली माहीत नव्हती किंवा ती त्यात सामील नव्हती असंही म्हटलं.
सुकेश चंद्रशेखरवर अनेक गंभीर आरोप आहेत. २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तो सध्या जेलमध्ये आहे. महाठग सुकेश आणि जॅकलिनचे काही फोटोही समोर आले होते, ज्यानंतर खळबळ उडाली होती. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच जेलमध्ये असताना देखील सुकेश नेहमीच जॅकलिनसाठी लव्हलेटर लिहित असतो.