Join us

मराठी कलाकारांची डोंगराएवढी माणुसकी

By admin | Updated: September 12, 2015 04:34 IST

समाजातील घटना-घडामोडींबाबत संवेदनशील राहून त्याचे रुपेरी पडद्यावर प्रतिबिंब पाडण्यात मराठी कलाकार नेहमीच जागरूक राहिले आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचा

- नम्रता फडणीससमाजातील घटना-घडामोडींबाबत संवेदनशील राहून त्याचे रुपेरी पडद्यावर प्रतिबिंब पाडण्यात मराठी कलाकार नेहमीच जागरूक राहिले आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न तर अनेक पद्धतींनी मांडला. ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या चित्रपटात तर त्याचे आपल्या पद्धतीने उत्तर शोधताना कृषिमंत्र्यांचे अपहरण करून त्याला शेतकऱ्यांच्या वास्तव परिस्थितीची जाणीव करून देण्यात येते. या भूमिकेमध्ये मकरंद अनासपुरे यांनी अत्यंत ताकदीने शेतकऱ्यांची वेदना दाखविली होती. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या नातेवाइकाचा संताप, असहायता, चीड आणि वेदना केवळ पडद्यावर दाखवून मकरंद अनासपुरे गप्प बसले नाहीत, तर थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मनाला उभारी देण्यासाठी दौरे करू लागले आहेत. आर्थिक मदत देत आहेत. अत्यंत संवेदनशील कलाकार असणारे नाना पाटेकर त्यांच्यासोबत आहेत. नानांनी पडद्यावर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या ‘अ‍ॅँग्री मॅन’च्या अनेक भूमिका साकारल्या. मात्र, प्रत्यक्षात अत्यंत हळव्या असलेल्या नानांनी राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या मदत अभियानाला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळू लागला आहे. मराठीतील अष्टपैलू अभिनेता जितेंद्र जोशीदेखील या मोहिमेत सहभागी झाले आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नाना आणि मकरंदने मदत दिली. त्या वेळी त्यांची दु:खे आणि व्यथा जाणून घेताना दोघांचेही डोळे नकळतपणे पाणावले होते. आमची मदत या कुटुंबीयांना आयुष्यभर तर पुरणार नाही, मात्र थोड्याफार प्रमाणात त्यांचे अश्रू पुसण्याचा आमचा प्रयत्न आहे, बाबा रे आता तरी आत्महत्या करू नका, आपल्या कुटुंबासाठी जगा,’’ असे भावनिक आवाहन नाना आणि मकरंद करत असून समाजातून त्याला पाठिंबा मिळत आहे़ सध्या या सामाजिक उपक्रमाचा गैरफायदा घेत काही मंडळींकडून समाजाची दिशाभूल केली जात आहे, अशा व्यक्तींपासून सावधान राहण्याचा इशारा त्याने दिला आहे. यासंदर्भात फेसबुकवर मकरंद अनासपुरे यांच्याशी संपर्क साधावा. नाना पाटेकर यांच्या नावाने पैसे गोळा करून फेक अकाउंटदेखील काढण्यात आले होते. वेळीच कळल्याने ते अकाउंट बंद करण्यात यश आले. मात्र, यानिमित्ताने असे प्रकार घडू लागल्यामुळे लोकांना आवाहन करण्याची वेळ आली आहे. - जितेंद्र जोशीमराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा धनादेश देण्याचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला. आता दुसऱ्या टप्प्यात ज्यांना मदत करण्याची इच्छा आहे, अशांनी पाच कुटुंबीयांच्या वारसदारांची नावे आम्हाला वैयक्तिक कळवायची आहेत. मात्र, ही गोष्ट तातडीने केली जाणार नाही. सध्या एखादा ट्रस्ट स्थापन करण्याच्या दृष्टीने नानाने प्रक्रिया सुरू केली आहे. यात बँकेत रीतसर खाते उघडण्यात येईल, त्यामुळे प्रक्रियेत एकप्रकारे पारदर्शकता राहणार असून, इच्छुक व्यक्ती आम्हाला माहिती पाठवून थेट बँकेमध्ये पैसे जमा करू शकतील. आमच्या व्यतिरिक्त कुणाकडे पैसे दिल्यास त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. - मकरंद अनासपुरे, प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ चित्रपटात शेतकऱ्यांची वेदना अत्यंत हृदयद्रावकपणे मांडली होती. चित्रपटातील शेवटचा कोर्टसीन म्हणजे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची खरीखुरी व्यथा होती. ‘‘तुम्हीच सांगा आम्ही जगायचं का नाही? शेपूट हलवून हलवून म्हैस दमते; पण कावळा उडत नाही, तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडत नाही. कोरड्या आभाळावानी कपाळ असणाऱ्या बायका, बिनबापाची लेकरं असल्यासारखी माळावर फिरणारी जनावरं हे सारं गावाला नजर लागली म्हणून नाही झालं, तर गावाकडं कुणाची नजर गेली नाही म्हणून झालं. गोचिडासारखं सातबाऱ्याला चिकटून आहेत सावकार आणि बुजगावण्यासारखे उभे आहे सरकार. आभाळ वागतंय सावत्र आईवानी...’’