Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मंदिरात देवीचे कपडे पुरूष पुजारी कसे काय बदलतात?", टीव्ही अभिनेत्रीचा सवाल, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 15:22 IST

मंदिरात देवीच्या मूर्तीचे कपडे बदलणाऱ्या पुरुष पुजाऱ्यांवर पवित्राने आक्षेप घेतला आहे. त्यांना हा अधिकार कोणी दिला? असा सवालही तिने उपस्थित केला आहे.

पवित्रा पुनिया हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. बिग बॉसमध्येही ती सहभागी झाली होती. पवित्रा पुनिया अभिनयासोबतच तिच्या बेधडक स्वभावासाठीही ओळखली जाते. नुकतंच एका मुलाखतीत अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. या मुलाखतीतून मंदिरात देवीच्या मूर्तीचे कपडे बदलणाऱ्या पुरुष पुजाऱ्यांवर पवित्राने आक्षेप घेतला आहे. त्यांना हा अधिकार कोणी दिला? असा सवालही तिने उपस्थित केला आहे. 

पवित्रा पुनियाने नुकतीच बी ब्लंट पॉडकास्टला हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये ती म्हणाली, "मंदिरातील देवीच्या मूर्तीचे कपडे एक पुरुष पुजारी कसे काय बदलू शकतो? मी या गोष्टीच्या विरोधात आहे. तुम्हाला कोणी अधिकार दिला? तुम्ही पंडित आहात, पुजारी आहात, साधू आहात तर तुम्ही मूर्तीची पूजा करा. पण, तुम्हाला मूर्तीचे कपडे बदलण्याचा अधिकार कोणी दिला? मान्य आहे की ती देवी आहे. पण, माता पार्वतीनेही अंघोळ करताना कोणी आतमध्ये येऊ नये म्हणून गणपतीला बाहेर सुरक्षेसाठी उभं केलं होतं. भगवना शंकरालाही त्याने आतमध्ये पाठवलं नव्हतं. तर मग तुम्ही कोण आहात?" 

"तुम्ही पुरुष आहात तर तुम्ही देवाची पूजा करा. देवाच्या मूर्तीचे कपडे बदला. तुमच्या साधनेवर किंवा तुम्ही सिद्धपुरुष असण्यावर मी शंका घेत नाही. पण, तरीदेखील ती एक महिला आहे. माझ्या आईचे कपडे बदलण्यासाठी मी कोणत्याही पुरुषाला सांगणार नाही. मी माझ्या भावाला विचारलं की जर मी तुझ्यासमोर कपडे बदलले तर तुला ते बरोबर वाटेल का? तो म्हणाला तू वेडी आहेस का?", असं म्हणत तिने सवाल उपस्थित केला आहे. तिच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकांनी पवित्रा पुनियाला समर्थन दिलं आहे. तर असं वक्तव्य केल्यामुळे काहींनी तिला खडे बोल सुनावले आहेत. 

टॅग्स :टिव्ही कलाकार