Join us

रूपगर्विता अभिनेत्री मर्लिन मुन्रोचा पुतळा चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 13:42 IST

मर्लिन मुन्रोची मोहिनी आजही प्रेक्षकांवर कायम आहे. याच रूपगर्वितेचा पुतळा पब्लिक आर्ट स्पेसपाशी असणा-या फोर लेडीज आॅफ हॉलिवूड गझेबो येथून चोरी झाला आहे. सोमवारी ही घटना उघडकीस आली.

ठळक मुद्देमर्लिन मुन्रोला सदाबहार अभिनेत्री मानले जाते. आज ती आपल्यात नाही. पण तिच्या सौंदर्याच्या चर्चा आजही होतात.

एकेकाळची हॉलिवूड सेन्सेशन म्हणून जगभर प्रसिद्धी मिळविलेल्या मर्लिन मुन्रोने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने एक काळ गाजवला. तिचे सौंदर्य आजही सर्वांना भूरळ पाडते. चेहऱ्यावरची निरागसता, मादक डोळे, सुंदर ओठ अशा मर्लिन मुन्रोची मोहिनी आजही प्रेक्षकांवर कायम आहे. याच रूपगर्वितेचा पुतळा पब्लिक आर्ट स्पेसपाशी असणा-या फोर लेडीज ऑफ हॉलिवूड गझेबो येथून चोरी झाला आहे. सोमवारी ही घटना उघडकीस आली.स्टेनलेस स्टील आणि अ‍ॅल्युमिनियम वापरून बनवलेला हा पुतळा लॉस एंजिल्सच्या हॉलिवूड पब्लिेक आर्ट स्पेसमध्ये गत कित्येक वर्षांपासून सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. 1955 मध्ये प्रदर्शित ‘द सेवन ईअर इच’ या चित्रपटातील एका दृश्यावर आधारित हा पुतळा 1994 साली स्थापित करण्यात आला होता. मर्लिनच्या तोंडून ‘हॉलिवूड...’असे शब्द बाहेर पडतानाचा क्षण या माध्यमातून जिवंत करण्यात आला होता. सोमवारी अचानक हा पुतळा गायब झाला. लॉस एंजिल्सच्या पोलिसांनी या पुतळ्याचा शोध सुरु केला आहे.

लॉस एंजिल्स कौन्सिलमैन Mitch O’Farrell यांनी KNBC-TVला सांगितले की, आमच्याकडे एक प्रत्यक्षदर्शी आहे. त्याने एका व्यक्तिला पाहिले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्येही एक व्यक्ति या कलाकृतीवरून खाली उडी मारताना आणि बॅग घेऊन पळताना दिसतोय. मात्र या बॅगमध्ये काय होते, हे स्पष्ट नाही.

मर्लिन मुन्रोला सदाबहार अभिनेत्री मानले जाते. आज ती आपल्यात नाही. पण तिच्या सौंदर्याच्या चर्चा आजही होतात. तिचे सौंदर्य, तिचे ग्लॅमर, तिच्या अफेअरचे किस्से, तिचा अनपेक्षित मृत्यू अशा सर्वच गोष्टींची चर्चा होते. 16 वर्षांची असताना मर्लिनने लग्न केले होते. तिचा पहिला पती व्यवसायाने नाविक होता. त्यामुळे तो अनेक दिवस घराबाहेर रहायचा. अशात मर्लिनने एका फॅक्टरीमध्ये नोकरी केली. तिथे एका फोटोग्राफरच्या सल्ल्यानंतर तिने मॉडलिंग करणे सुरु केले. पुढे 1946 मध्ये तिचा घटस्फोट झाला आणि याच वर्षी तिने तिचा पहिला सिनेमा साईन केला.

मर्लिन मुन्रोने 30 पेक्षा जास्त सिनेमात काम केले. आजही तिच्या सुंदरतेची आणि अदाकारीची भरभरुन प्रशंसा केली जाते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडीपासून गायक फ्रँक सिनात्रा आणि बेसबॉल खेळाडू जो डिमेगियो यांच्यासारख्या अनेकांसोबत तिचे नाव जोडले गेले होते. 1962 मध्ये अचानक तिच्या मृत्यूची बातमी आली. तिच्या मृत्यूचे रहस्य आजही कायम आहे.

टॅग्स :हॉलिवूड