मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. अनंत अंबानी आणि राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यात जिच्या आवाजाच्या जादूने सर्वांना आनंद दिला अशी गायिका रिहाना तिसऱ्यांदा आई झाली आहे. पॉप जगताची क्वीन म्हणून ओळखली जाणारी आंतरराष्ट्रीय गायिका रिहाना आणि तिचा जोडीदार रॅपर रॉकी (A$AP Rocky) यांच्या घरी तिसऱ्या अपत्याचा जन्म झाला आहे. रिहानाने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून त्यांनी मुलीचं बारसंही केलं आहे.रिहाना तिसऱ्यांदा झाली आई रिहानाने आपल्या मुलीचे नाव 'रॉकी आयरिश मेयर्स' (Rocki Irish Mayers) असं ठेवलं आहे. रिहानाची मुलगी 'रॉकी आयरिश मेयर्स'चा जन्म १३ सप्टेंबर २०२५ रोजी झाला. रिहानाने नुकतीच सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली, ज्यात तिने बाळासोबतचा एक हृदयस्पर्शी फोटो पोस्ट केला आहे. रिहाना आणि तिचा बॉयफ्रेंड A$AP Rocky यांच्यासाठी हा खूप खास क्षण आहेत.
रिहानाला दोन मुलं असून तिचा मोठा मुलगा रिझा याचा (RZA) जन्म २०२२ मध्ये झाला, आणि दुसरा मुलगा रायट (Riot) २०२३ मध्ये जन्माला आला. 'रॉकी आयरिश मेयर्स'च्या रूपाने आता त्यांच्या कुटुंबात एका मुलीचं आगमन झालं आहे. रिहाना तिसऱ्यांदा गरोदर आहे ही बातमी यंदाच्या मेट गाला (Met Gala) २०२५ मध्ये समोर आली होती, जिथे तिने फॅशनेबल अंदाजात बेबी बंप दाखवून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.
अंबानींच्या लग्नात रिहानाने दिलेला परफॉर्मन्स
जागतिक पॉप स्टार रिहानाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात आपल्या परफॉर्मन्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. गुजरातच्या जामनगरमध्ये झालेल्या या भव्य कार्यक्रमात रिहानाने केलेल्या दमदार परफॉर्मन्सची जोरदार चर्चा झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिने या एका परफॉर्मन्ससाठी जवळपास ७४ कोटी रुपये घेतले होतं. हा आकडा ऐकून अनेकांना आश्चर्य वाटलंं, कारण एखाद्या खाजगी कार्यक्रमासाठी एवढं मोठं मानधन घेणारी ती काही मोजक्या आंतरराष्ट्रीय कलाकारांपैकी एक आहे.