प्रसिद्ध रशियन मॉडेल आणि ब्युटी क्वीन असलेल्या क्सेनिया अलेक्झेंड्रोवा हिचा विचित्र अपघातात मृत्यू झाला आहे. ती ३० वर्षांची होती. क्सेनिया तिच्या पतीसोबत फिरायला गेली असताना ही दुर्देवी घटना घडली. Elk प्रजातीच्या बिथरलेल्या हरीणाने त्यांच्या गाडीला धडक दिली. ज्यामध्ये क्सेनियाच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्यात तिचा मृत्यू झाला.
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ५ जुलैला हा अपघात झाला. त्यानंतर क्सेनियाला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती कोमात गेली होती. अखेर १२ ऑगस्टला तिची प्राणज्योत मालवली. "सगळं काही क्षणात घडलं की मला काहीच करता आलं नाही. त्या बिथरलेल्या हरीणाने गाडीला धडक दिली ज्यामध्ये क्सेनियाच्या डोक्याला दुखापत झाली. ती रक्ताने माखली होती", अशी माहिती तिच्या पतीने दिली आहे.
क्सेनिया ही लोकप्रिय रशियन मॉडेल होती. मिस रशिया २०१७ची उपविजेती होती. तर मिस युनिव्हर्स २०१७मध्ये तिने देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं. एप्रिल महिन्यांतच तिने लग्न करत संसार थाटला होता. दुर्देवाने तिचा मृत्यू झाला आहे.