चित्रपटाच्या या नावावरून हा मराठी चित्रपटच आहे का, असा प्रश्न पडला असेल तर त्यात काही चुकीचे वाटून घेऊन नका. केवळ नावापुरताच नव्हे; तर ‘तुझ्या विन मरजावां’ हा संपूर्ण चित्रपट म्हणजे हिंदी सिनेमाच्या धर्तीवर केलेली पेरणी आहे. तद्दन मसालापट म्हणून खपून जाईल, असा तोंडवळा घेऊन हा चित्रपट पडद्यावर सादर झाला आहे.कॉलेजमधल्या दोघांचे प्रेम, मग घरच्यांकडून या प्रेमाला विरोध, पुढे त्यांचे पळून जाणे वगैरे वगैरे.. हा फॉर्म्युला हिंदी चित्रपटांत वापरून गुळगुळीत झाला आहे. हाच गुळगुळीतपणा या चित्रपटात अवतरला असून, त्यावरून किती घसरायचे हे प्रत्येकावर सोडून देणेच योग्य ठरेल. पण असे झाले तरी कपाळमोक्ष होणार नाही, याची काळजी मात्र या चित्रपटाने घेतली आहे. अनिकेत हा मराठी मुलगा; तर निशा ही पंजाबी कुडी! या दोघांचे कॉलेजमध्ये प्रेम जमते. निशाच्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात एका मराठी माणसाने फसवले असल्याची त्यांची भावना असते. त्यामुळे त्यांना मराठी माणसांचा राग असतो. साहजिकच, अनिकेत व निशाचे एकत्र येते कठीण होऊन जाते. पण अखेरीस सगळे काही गोड गोड होऊन हा चित्रपट संपतो.चित्रपटाच्या कथेत नावीन्य असे काहीच नाही. सरळसरळ हिंदी सिनेमाच्या भट्टीतून बाहेर आलेला हा चित्रपट आहे. दिग्दर्शकद्वयी मुरली नल्लपा व अशोक कार्लेकर यांनी पूर्णत: व्यावसायिक चित्रपट दिला असून, केवळ मनोरंजन एवढाच त्यांचा उद्देश आहे. यात प्रार्थना बेहेरेने रंगवलेल्या निशामुळे चित्रपट फ्रेश वाटतो; परंतु तिची म्हणावी तशी छाप या चित्रपटात पडलेली नाही. विकास पाटीलने अनिकेतची भूमिका ठीक केली आहे; पण त्याचा प्रभाव पडलेला नाही. अनिकेतच्या आईच्या भूमिकेत मात्र प्रतीक्षा लोणकर यांनी अनुभवी अभिनयाची साक्ष दिली आहे. अनिकेतच्या मामाचे अतुल परचुरेने वठवलेले पात्र आगाऊ आहे आणि विविध गेट-अप घेऊन त्याने भरलेला हास्याचा बार अजिबात वाजलेला नाही. अवधूत गुप्तेने चित्रपटाचे संगीत त्याच्या स्टाईलने दणक्यात वाजवले आहे. थोडक्यात, चित्रपट पाहाताना मध्येच एखादी डुलकी काढली तरी फार काही बिघडण्यासारखे नाही.- राज चिंचणकर
मराठी चित्रपटमराठीला हिंदीचा तडका
By admin | Updated: June 13, 2015 23:36 IST