Join us

हवेत उंच उडणारे फुगे

By admin | Updated: February 11, 2017 03:33 IST

बऱ्याच चित्रपटांचा शेवट ‘...आणि ते दोघे सुखाने संसार करू लागले’ अशा थाटात होतो आणि प्रेक्षकांच्याही हे अंगवळणी पडलेले दिसते.

बऱ्याच चित्रपटांचा शेवट ‘...आणि ते दोघे सुखाने संसार करू लागले’ अशा थाटात होतो आणि प्रेक्षकांच्याही हे अंगवळणी पडलेले दिसते. ‘फुगे’ या चित्रपटातही हाच थाट आहे; मात्र यातले ‘ते दोघे’ म्हणजे ‘तो’ आणि ‘ती’ नसून, खरेच ‘ते’ दोघे आहेत. थेट एका राजघराण्याच्या पार्श्वभूमीवर ही कथा सुरू होते आणि ती वेगळ्याच वळणावर जाऊन थांबते. या घराण्याचा नातू आदित्य आणि त्याचा मित्र हृषीकेश यांच्यात ‘तसे काही’ असल्याचे प्रथमदर्शनीच सूचित होत जाते आणि हाच धागा पकडत ही कथा पुढे सरकते. सुबोध भावे आणि स्वप्निल जोशी यांच्या कथेवर हेमंत ढोमे आणि अभिजित गुरू यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.चित्रपटाच्या पूर्वार्धात अनेक प्रसंग आदळत जातात आणि उत्तरार्धातही काही अनावश्यक प्रसंग डोकावत राहतात. वास्तविक ‘गे’ प्रकाराकडे झुकणारा विषय या चित्रपटाने हाती घेतला आहे, मात्र त्याची मांडणी फार्सिकल पद्धतीची झाली आहे. केवळ विनोदासाठी विनोद असे या चित्रपटाचे एकंदर स्वरूप आहे. दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी यापूर्वी जे काही चांगले चित्रपट दिले आहेत, त्या तुलनेत हा चित्रपट निव्वळ करमणुकीसाठी केलेला दिसतो. स्वप्निल जोशी, सुबोध भावे, मोहन जोशी, सुहास जोशी, आनंद इंगळे, प्रार्थना बेहेरे आदी अनुभवी कलावंत चित्रपटात आहेत. स्वप्निल जोशी (आदित्य) आणि सुबोध भावे (हृषीकेश) या दोघांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिकांतून हशा पिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आनंद इंगळे (दाजी) यानेदेखील अभिनयाची चुणूक दाखवली आहे. थोडक्यात, डोके पार बाजूला काढून ठेवत निव्वळ आणि निव्वळ ‘करमणूक’ म्हणून या चित्रपटाकडे पाहिल्यास तो मनोरंजक वाटू शकतो.