Join us

नायिका म्हणतात, 'मेरी आवाज सुनो'

By admin | Updated: May 30, 2015 09:31 IST

महिलाप्रधान चित्रपटांना मिळालेल्या यशामुळे नायकांच्या तुलनेत नट्यांना मिळणारे मानधन कमी आहे का याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

मानधन कमीच : बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमूनही उपेक्षितच

अनुज अलंकार■ मुंबई
महिलाप्रधान चित्रपटांना मिळालेल्या यशामुळे नायकांच्या तुलनेत नट्यांना मिळणारे मानधन कमी आहे का याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. २२ मे रोजी प्रदर्शित झालेल्या कंगना रानावतच्या 'तनु वेडस् मनु रिटर्नस्' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पाच दिवसांतच ५५ कोटी रुपयांचा गल्ला जमविला. त्याआधी प्रदर्शित झालेल्या दीपिका पदुकोनच्या 'पिकू'च्या बॉक्स ऑफिसवरील यशाचे चाक आजही फिरतच आहे व त्याने आतापर्यंत ७0 कोटींपेक्षाही जास्त व्यवसाय केला आहे. याचवर्षी प्रदर्शित झालेल्या अनुष्का शर्माच्या 'एनएच १0'नेही बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळविले होते.
'तनु वेडस् मनु रिटर्नस्'च्या यशानंतर कंगनाने नायिकेला मिळणार्‍या मानधनाचा मुद्दा उपस्थित केला आहे. ती म्हणाली, ''हीरोईनला एवढा कमी पैसा का दिला जातो या मुद्दय़ावर बॉलिवूडने गांभीर्याने विचार केला पाहिजे.'' तिचे म्हणणे असे की, प्रेक्षकांची आवडनिवड बदलत आहे व त्यांना जर असे चित्रपट (नायिकाप्रधान) आवडत असतील तर हीरोईनला मिळणार्‍या कमी मानधनाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. गेल्या वर्षी 'मेरी कोम'च्या जीवनावर चित्रपट तयार झाला होता व प्रियंका चोप्राने 'मेरी कोम' प्रदर्शित व्हायच्या वेळी मानधनाचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला होता. प्रियंकाचे म्हणणे असे होते की, ''आम्ही सगळे कष्ट करतो तर मानधनही कष्टांच्या तुलनेतच असायला हवे. हीरोईन व हीरो यांच्या मानधनात खूपच अंतर आहे व त्यात बदल झाला पाहिजे.''
साधारणत: हिंदी चित्रपटातील मोठय़ा कलाकारांना (विशेषत: खान) एका चित्रपटाचे मानधन ४0 कोटींपेक्षाही जास्त मिळते, असे समजले जाते व हेच मानधन हीरोईनला फक्त ५ ते ८ कोटींचे असते. सध्याच्या दिवसांत कतरिना कैफ ही सगळ्यात महागडी हीरोईन समजली जाते. तिला एका चित्रपटासाठी ८ कोटी रुपये दिले जातात; कारण ती नशीबवान (लकी) समजली जाते. दीपिका, प्रियंका आणि याच दर्जाच्या अन्य हीरोईन्सना मिळणारे मानधन ५ कोटी रुपयांचे आहे. कंगना रानावत, अनुष्का शर्मा, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, सोनम कपूर यांचे मानधन २ ते ३ कोटींच्या जवळपास असते.
महिलाप्रधान चित्रपट बनविणारे महेश भट्ट या मुद्दय़ाला आर्थिक गणिताशी जोडतात. ''जर चित्रपट हिट ठरला तर त्याचा लाभ सगळ्या टीमला झाला पाहिजे अशी माझी भूमिका आहे,'' असे भट्ट यांचे म्हणणे आहे. नायिकाप्रधान चित्रपट चांगला व्यवसाय करीत असल्यामुळे भट्ट यांनी त्याचे स्वागत केले, यामुळे लोकांचा विश्‍वास वाढतो, असे त्यांनी सांगितले. हीरोईनचे मानधन वाढविण्याच्या मुद्दय़ावर महेश भट्ट हसून म्हणतात की, ''महागाई सगळ्यांसाठीच वाढत आहे. कलाकारांपासून ते निर्मात्यांपर्यंत सगळ्यांनाच खर्च भागविण्यासाठी पैशांची गरज आहे.'' जास्त खोलात जाऊन विचारता भट्ट म्हणतात, ''आम्ही मोठय़ा बजेटचे चित्रपट तयार करीत नाही व प्रत्येकाला मानधनाच्या मुद्दय़ावर स्पष्टपणे सांगितलेले असते. तुम्हाला जेव्हा मागणी असते तेव्हा तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या जातात अशा शब्दांत त्यांनी हा मुद्दा बाजाराच्या नियमांशी जोडला.
चित्रपट विश्लेषक विनोद मीरानी म्हणतात की, येथे कुणाला मागून काही मिळत नाही. बाजार प्रत्येकाची लायकी निश्‍चित करतो. जसजसे यश मिळते त्यानुसार माननधही वाढत असते. ते म्हणाले की, नैतिकदृष्ट्या मी या मागणीचा पाठीराखा असलो तरी लगेचच येथे काही सुधारणा होणार नाही हेही मला माहिती आहे.