- अनुज अलंकार (हिंदी चित्रपट परीक्षण)तीन दशकांपूर्वी निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांनी दोन नवीन चेहऱ्यांना (जॅकी श्रॉफ, मीनाक्षी शेषाद्री) संधी देत ‘हीरो’ चित्रपट बनविला होता. बॉक्स आॅफीसवर मोठे यश मिळविणाऱ्या या चित्रपटामुळे बॉलीवूडला मिळालेले हे दोन्ही नवोदित पुढे मोठे स्टार झाले. प्रेमकथेवर आधारित ‘हीरो’ त्याकाळी खूप गाजला होता. अनेक वर्षांनी त्याच चित्रपटाचा रिमेक करण्याचा निर्णय सलमान खानच्या प्रॉडक्शन कंपनीने घेत दोन नवीन चेहऱ्यांना (सूरज पंचोली-अथिया शेट्टी) रुपेरी पडद्यावर झळकविले आहे. निखिल अडवाणी यांच्या दिग्दर्शनाखालील ‘हीरो’ अपेक्षांवर मात्र खरा उतरत नाही. त्यामागची कारणेही अनेक आहेत.कथानक सूरज (सूरज पंचोली) आणि राधा (अथिया शेट्टी) केंद्रित आहे. सूरज हा मुंबईचा गुंड असतो, तर राधा पोलीस अधिकारी श्रीकांत माथूर (तिग्मांशू धुलिया) यांची कन्या असते. एका पत्रकाराच्या हत्येच्या आरोपावरून पोलिसांनी पाशाला (आदित्य पंचोली) अटक केलेली असते. पाशाच्या सांगण्यावरून सूरज राधाचे अपहरण करतो, जेणेकरून पोलीस पाशाची सुटका करतील. अपहरणानंतर राधा आणि सूरज एकमेकांच्या प्रेमात पडतात. राधाच्या प्रेमाखातर सूरज पोलिसांना शरण जातो. त्याला दोन वर्षे तुरुंगवास होतो. दुसरीकडे राधाचे लग्न सूरजऐवजी दुसऱ्याशी लावण्याची तिच्या वडिलांची इच्छा असते. राधा आणि सूरज यांचे जीवापाड प्रेम असल्याची कल्पना राधाच्या भावाला (शरद केळकर) असते. तो पोलीस इन्स्पेक्टर असतो. अशा स्थितीत तो राधाच्या बाजूने उभा राहतो. राधाचे लग्न ज्याच्याशी ठरले असते तो पाशाला सामील होतो. तेव्हा राधाला वाचविण्यासाठी सूरज पुढे येतो. शेवटी राधाचे कुटुंबीय सूरजला स्वीकारतात.उणिवा : निखिल अडवाणी रिमेकची गरजच विसरले आहेत. दोन नवीन चेहऱ्यांना रुपेरी पडद्यावर आणण्यासाठी अशा प्रेमकथेची गरज आहे, हेच ते विसरले आहेत. रिमेक करण्यासाठी निखिल अडवाणी आणि त्यांच्या टीमने घेतलेले निर्णय या चित्रपटासाठी नुकसानकारक ठरले आहेत. चित्रपटाची सुरुवात एवढी सुस्त आहे की, १० मिनिटांतच चित्रपट मार्गावरून भरकटतो. निरर्थक लांबलचक दृश्यांमुळे चित्रपट कमकुवत होत गेला. दोन नवीन चेहऱ्यांची रुपेरी पडद्यावर ठीक ओळखही करून देता आलेली नाही. नवीन हीरो चित्रपट ८० दशकातील ‘हीरो’च्या मुकाबल्यात कमी पडला असून, आजच्या युवा पिढीतील प्रेक्षकांनाही आकर्षित करीत नाही. जुन्या चित्रपटातील शम्मी कपूरचे पात्र तिग्मांशू आणि संजीव कुमारचे पात्र शरद केळकर यांना ताकदीने वठविता आलेले नाही. संगीताच्या बाबतीत सलमान खानच्या आवाजातील ‘मैं हूँ हीरो...’ हे गाणे सुपर हिट झाले आहे. परंतु पडद्यावर कोणतेच गाणे प्रभावी झालेले नाही.का पाहावा ? उत्सुकता म्हणून पाहण्यास हरकत नाही. तथापि, अधिक आशा न बाळगणेच ठीक.का पाहू नये ? दोन नवीन चेहऱ्यांची लव्हस्टोरी असतानाही चित्रपट भावत नाही.एकूणच चित्रपटातील उणिवा आशांवर प्रभावी झालेल्या दिसतात. वैशिष्ट्ये : सूरज आणि आशिया यांच्यातील केमिस्ट्री चांगली आहे. कॅमेरावर्क चांगले आहे. अॅक्शन दृश्येही प्रभावी झाली आहेत.
हीरोला उणिवांचा फटका
By admin | Updated: September 12, 2015 04:02 IST