चित्रपटात हिरोसोबत दोन हात करीत लढणाऱ्या खलनायकांच्या सिन्सवर थिएटरमध्ये टाळ्या अन् शिट्ट्या पडल्याशिवाय राहत नाही. गब्बर.. मोगॅम्बो.. यांच्या भूमिका तर प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहून ती कॅरेक्टर्स चित्रपटाच्या इतिहासात जमा झाली आहेत. अंगावर शहारे उभे राहतील अन् त्यांना समोर पाहिले की तळपायाची आग मस्तकाला जाईल, असे जर प्रेक्षकांचे झाले की समजायचे त्या कलाकाराने खलनायकाला यशस्वीपणे पडद्यावर आणले आहे. चित्रपटात जोपर्यंत एखादा तगडा खलनायक नाही तोपर्यंत त्या चित्रपटात जान नाही, असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. हिंदी चित्रपटांमध्ये ज्याप्रमाणे व्हिलनच्या भूमिका कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत, तसेच रांगडे खलनायक आपल्याला मराठी चित्रपटांमध्येदेखील दिसलेले आहेत. एवढेच काय, तर नायकांच्या भूमिका करणाऱ्या कलाकारांनादेखील आता खलनायक साकारण्याची भुरळ पडली आहे. मराठी चित्रपटातील नायक रंगविणाऱ्या कलाकारांच्या खलनायकी अंदाजाचा सीएनएक्सने घेतलेला हा खास आढावा...नागेश भोसले हे नाव तर खलनायकाच्या भूमिकेत परफेक्ट बसणारे आहे, असे म्हणायला हरकत नाही. नागेश भोसले यांनी हिंदी-मराठी अशा अनेक चित्रपटांमध्ये तडफदार खलनायक साकारला आहे. त्यांचा बोलण्याचा बाज, आवाजातील दबदबा समोरच्याला पुरता गार करून टाकतो. त्यांच्या नजरेतील एका कटाक्षाने माणूस घायाळ होईल एवढी ताकद त्यांच्या नजरेत आहे. नागेश भोसले यांनी फक्त खलनायकच नाही, तर गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा यांसारख्या चित्रपटांमधून नायकाच्या भूमिकादेखील केल्या आहेत.मकरंद अनासपुरे यांच्या बोलण्यातील एक अलग अंदाज त्यांची भाषा आणि विनोदशैली यांचे तर मराठी प्रेक्षक चाहते आहेत. आतापर्यंत मकरंद यांनी अनेक वेगवेगळ््या भूमिका साकारल्या आहेत. प्रेक्षकांनी त्यांना विनोदी भूमिकेमध्येच जास्त पसंत केले आहे. परंतु मकरंद अनासपुरे यांनी त्यांची ही इमेज बाजूला सरकावीत पारध या चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. मकरंद यांच्या पारधमधील अंबादास या कॅरेक्टरचे प्रेक्षकांकडूनदेखील कौतुक करण्यात आले. विनोदी भूमिका साकारणारा नट खलनायकाच्या रूपातदेखील पडद्यावर आग लावू शकतो, हेच मकरंद अनासपुरे यांनी पारध या चित्रपटातील खलनायकाच्या माध्यमातून दाखविले आहे.भरत जाधव यांच्या चित्रपटांचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग आहे. मराठीतील अव्वल स्टार अन् सशक्त अभिनेता म्हणून भरत जाधव यांच्याकडे पाहिले जाते. अनेक दर्जेदार आणि हिट चित्रपट भरत जाधव यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यांचे कॉमिक टायमिंग तर अफलातून आहे. प्रेक्षकांना खळखळून हसविण्याचे सामर्थ्य भरत जाधव यांच्या अभिनयात आहे. परंतु फक्त विनोदी चाकोरीत न अडकता आपणही खलनायक पेलू शकतो, असे दाखवीत भरत जाधव, बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटामध्ये एकदमच अनोख्या रूपात प्रेक्षकांसमोर आले. घोटाळे हे त्यांनी साकारलेले पात्र अतिशय वेगळ््या लुकमध्ये होते. भरत जाधव यांच्या या निगेटिव्ह भूमिकेला प्रेक्षकांनी मात्र पसंती दर्शविली.नटसम्राटसारखी भूमिका साकारणारे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनीदेखील खलनायकाच्या भूमिका जबरदस्त रंगविल्या आहेत. डॉ. प्रकाश बाबा आमटे, नटसम्राट, पक पक पकाक या चित्रपटातील नानांच्या भूमिका पाहिल्या, तर कोणालाच विश्वास बसणार नाही हा कलाकार पडद्यावर खतरनाक व्हिलनची भूमिका साकारू शकेल. परंतु नानांनी हिंदी चित्रपट अन् मराठीमध्येदेखील खलनायकाचा रोल केला आहे. १९८६ साली प्रदर्शित झालेला माफीचा साक्षीदार हा चित्रपट पुण्यातील जोशी-अभ्यंकर खून प्रकरणावर आधारित होता. या चित्रपटामध्ये नानांनी साकारलेली भूमिका खरंच प्रेक्षक विसरू शकणार नाहीत, एवढ्या ताकदीची होती. तर, अग्निसाक्षी या हिंदी सिनेमामध्ये नानांनी साकारलेला विश्वनाथ पाहताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. म्हेवणे.. म्हेवणे, म्हेवण्यांचे पाहुणे... असे म्हणणारा साई आठवतोय का तुम्हाला. दुनियादारी या चित्रपटामध्ये वेगळ््या धाटणीचा खलनायक साकारणारा साईराज म्हणजेच जितेंद्र जोशी त्या भूमिकेमध्ये अक्षरश: भाव खाऊन गेला. नायकाच्या भूमिका पडद्यावर यशस्वीरीत्या पेलणारा जितेंद्र दुनियादारीत थेट खलनायकाच्या भूमिकेतच प्रेक्षकांच्या समोर आला. त्याचा एकंदरीतच लुक, हेअरस्टाईल अन् डायलॉगबाजीचा अंदाज पाहता जितेंद्र साईराजच्या भूमिकेत एकदम उठावदार दिसला होता. एवढेच नाही, तर पोश्टर गर्ल या सिनेमातदेखील जितेंद्रने निगेटिव्ह शेडची भूमिका साकारली आहे. भारतराव झेंडे ही भूमिका पाहताना त्या कॅरेक्टरचा राग आल्याशिवाय राहत नाही. अशाप्रकारे जितेंद्र जोशीने नायकाच्या भूमिका साकारताना स्वत:ची खलनायकी ओळखदेखील निर्माण केली आहे.
नायक भी खलनायक...
By admin | Updated: April 20, 2016 02:28 IST