Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हॅप्पी बर्थ डे' मुमताज

By admin | Updated: July 31, 2016 12:24 IST

६० आणि ७० च्या दशकात एकामागून एक हिट सिनेमे देणा-या मुमताज यांनी एक्स्ट्रा ज्युनिअर आर्टिस्ट ते सुपर हिरोईनपर्यंत प्रवास केला.

संजीव वेलणकर
पुणे, दि. ३१ - ६० आणि ७० च्या दशकात एकामागून एक हिट सिनेमे देणा-या मुमताज यांनी एक्स्ट्रा ज्युनिअर आर्टिस्ट ते सुपर हिरोईनपर्यंत प्रवास केला. मुमताज यांनी बालकलाकाराच्या रुपात आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्या हिंदी सिनेमांमध्ये एक्स्ट्रा ज्युनिअर आर्टिस्टच्या रुपात झळकल्या. 
सुरुवातीच्या काळात त्यांना नशीबाची साथ मिळाली नाही, म्हणून लो बजेट आणि बी ग्रेड सिनेमांमध्ये त्यांना काम करावे लागले. १९६५ हे वर्ष मुमताज यांच्या करिअरच्या दृष्टीने फार महत्त्वाचे ठरले. यावर्षी मुमताज यांचा 'ऐ मेरे सनम' हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात त्यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. या नकारात्मक भूमिकेमुळे मुमताजच्या आयुष्यात सर्वकाही सकारात्मक होऊ लागले. बी ग्रेड सिनेमांमधली हिरोईनला आता ए ग्रेड सिनेमे मिळू लागले होते.
'पत्थर के सनम', 'राम और श्याम' आणि 'ब्रम्हचारी' या सिनेमांमध्ये त्यांनी सहायक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. 'दो रास्ते' या सिनेमातील हीरो होते सुपरस्टार राजेश खन्ना आणि त्यांच्या प्रेयसीच्या भूमिका मुमताज यांनी वठवली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि मुमताज एका रात्रीत बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये सामील झाल्या. या सिनेमाबरोबर मुमताजच्या यशाचा काळ सुरु झाला. यानंतर मुमताजे यांनी वळून बघितले नाही. 
'आदमी और इन्सान', 'परदेसी', 'सच्चा-झुठा' या सिनेमांमुळे त्यांची गणती बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये होऊ लागली. १९७० साली रिलीज झालेल्या 'खिलौना' या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. मुमताज यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक संस्मरणीय सिनेमे दिले. अधिकाधिक सिनेमांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. के. बालाचंदर दिग्दर्शित आणि १९७४ मध्ये रिलीज झालेल्या 'आईना' या सिनेमात मुमताजच्या अभिनयाचा वेगळा पैलू बघायला मिळाला. 
समीक्षक आणि स्वतः मुमताज या सिनेमातील भूमिकेला सर्वोत्कृष्ट अभिनय समजते. फिरोज खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'अपराध', 'इंटरनॅशनल गँग', 'कॉनमॅन' या क्राईमवर आधारित सिनेमांमध्ये मुमताज यांनी खूप बोल्ड सीन दिले होते.या सिनेमांमध्ये त्यांनी टू पीस बिकिनी परिधान करुन सगळ्यांना आश्चर्यचकित केले होते. मुमताज यांच्यावर चित्रीत झालेले 'हमारे सिवा तुम्हारे और कितने दिवाने है...' हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. 
यशोशिखरावर असताना १९७४ मध्ये मुमताज व्यावसायिक मयुर माधवाणी यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या. लग्नगाठीत अडकल्यानंतर आपले प्रोफेशनल कमिटमेंट पूर्ण होईपर्यंत हिंदी सिनेमांमध्ये काम केले. सध्या मुमताज युगांडामध्ये वास्तव्याला आहेत. २०१२ मध्ये भारतीय सिनेसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुमताज यांना इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमीच्या वतीने सेकंड मोस्ट पॉप्युलर ब्युटी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या समुहा तर्फे मा.मुमताज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.