ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा आज 51 वा वाढदिवस आहे. गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ आमिर बॉलिवूडवर राज्य करत आहे. कारकीर्दीच्या सुरुवातीला 'चॉकलेट बॉय' म्हणून इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण करणा-या आमिरची महिला वर्गावरील मोहिनी आजही कायम आहे. तरुणींमध्ये असलेले त्याचं वेड तसूभरही कमी झालेलं नाही. आमिर फार कमी सिनेमे करतो, पण जे सिनेमे तो हाती घेतो ते सामाजिक विषयावर आधारित असतात व त्यांचे सिनेमे सुपरडुपर हिटदेखील होतात.
आमिरच्या कारर्कीदीची सुरुवात
आमिरने बालकलाकार म्हणून वडिलांच्या प्रोडक्शन कंपनीचा सिनेमा 'यादों की बारात' मध्ये काम केले. त्यानंतर 'होली' सिनेमातही तो दिसला होता.
'कयामत से...'पासून मिळाली प्रसिद्धी
1988 साली आलेला ‘कयामत से कयामत तक’ सिनेमामुळे आमिरला ख-या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. या सिनेमामुळे आमिर रातोरात स्टार बनला. या सिनेमासाठी आमिरला स्पेशल ज्यूरी अवॉर्डनंही गौरवण्यात आले.
आमिरचे खासगी आयुष्य
आमिरचे पहिले लग्न रीना दत्तसोबत. आमिर आणि रीनाची दोन मुलंही आहेत. मुलाचं नाव जुनैद आणि मुलीचे नाव इरा असे आहे. रीनासोबत घटस्फोट घेतल्यानंतर आमिरने किरण रावसोबत लग्न केलं.
मिस्टर परफेक्शनिस्टपर्यंतचा सफरनामा
'कयामत से कयामत तक' सिनेमानंतर आमिरने अनेक सिनेमे केले, मात्र ते बॉक्सऑफिसवर सुपर फ्लॉप ठरले. यादरम्यान,'जो जीता वो सिकंदर' आणि माधुरी दीक्षितसोबतचा सिनेमा 'दिल' सिनेमामुळे तो रोमँटिक हिरो म्हणून ओळखला जाऊ लागला.
1996 मध्ये आमिरने करिश्मा कपूरसोबत केलेला सिनेमा 'राजा हिंदुस्तानी' बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. यानंतर 'अंदाज अपना-अपना'सारखा कॉमेडी सिनेमा असो किंवा 'सरफरोश' सारखा गंभीर विषयावरील सिनेमा, सर्व भूमिकांना आमिरने योग्य न्याय दिला. यामुळेच तो मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाऊ लागला. आमिरनं ‘तारे जमीं पर’, ‘इश्क’, ‘फना’, ‘गुलाम’, ‘दिल चाहता है’, ‘थ्री इडियट्स’, 'लगान', 'रंग दे बसंती', 'गजनी', 'पीके', 'दंगल' सारखे सुपरहिट सिनेमा दिले आहेत.
पुरस्कार सोहळ्यांवर बहिष्कार
आमिर खानच्या पुरस्कार न स्वीकारण्याच्या गोष्टीमुळे सर्वांचं लक्ष त्याच्याकडे आकर्षिक झाले होते. आजही आमिर पुरस्कार सोहळ्यांना हजेरी लावत नाही. याचे कारण 'पुरस्कारांमध्ये विश्वास नाही', असे आमिरचे म्हणणे आहे.
खासगी आयुष्यातील वाद
आमिर खानने 1986 मध्ये वय केवळ 21 वर्षे असताना रीनासोबत लग्न गेले, मात्र त्याचे कुटुंब या लग्नासाठी तयार नव्हते. जगाची तमा न बाळगता दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यांना मुलंही झाली. मात्र त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक चढ-उतार येऊ लागले. आमिरचे नाव अनेक मुलींसोबत जोडलं जाऊ लागलं, या गोष्टीमुळे रीना आणि आमिरमध्ये खटके उडू लागले.
ब्रिटनच्या महिला पत्रकारासोबतही जोडले गेले नाव
अनेक वृत्तपत्रांमध्ये छापण्यात आलेल्या बातमीनुसार, आमिरचे ब्रिटनमधील पत्रकार जेसिकासोबत नाव जोडले गेले होते. 'गुलाम' सिनेमाच्या सेटवर आमिर आणि जेसिकाची भेट झाली आणि यानंतर दोघं लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होती, असे बोलले जात होते. 2002मध्ये रीना आणि आमिरचा घटस्फोट झाला. 2005 मध्ये आमिरने किरण रावसोबत लग्न केलं.