Join us

मराठी संगीत नाट्यरंगभूमीवरील गुणी नट व गायक मा. केशवराव भोसलेंची जयंती.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2016 11:50 IST

मराठी संगीत नाट्यरंगभूमीवरील गुणी नट व गायक मा. केशवराव भोसले यांची आज (९ ऑगस्ट) जयंती

 संजीव वेलणकर

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. ९ -  मराठी संगीत नाट्यरंगभूमीवरील गुणी नट व गायक मा. केशवराव भोसले यांची आज (९ ऑगस्ट) जयंती.  केशवरावांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी स्वदेश हितचिंतक नाटक मंडळीत प्रवेश घेतला. संगीत शारदा ह्या नाटकातील मूर्तिमंत भीती उभी ह्या पदाने त्यांना प्रसिद्धी दिली. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी सिद्धारूढ स्वामींच्या आशीर्वादाने हुबळीमध्ये ललितकलादर्श नाटक मंडळी स्थापन केली. ह्या नाटक मंडळींचे पहिले नाटक संगीत सौभद्र १९०८ मध्ये गणेशपीठ, हुबळी येथे सदर केले गेले. त्यानंतर हे नाटक महाराष्ट्रातही सादर केले गेले. केशवरावांनी संस्कृत नाटक शाकुंतलमध्ये सुद्धा काम केले. त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षा नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथे झाला. वेल्वेट कापडाचा पडदा प्रथमच मराठी रंगभूमीवर वापरण्यात आला होता. केशवराव हे कलाप्रेमी आणि चतुर होते. त्यांनी वेळोवेळी केलेल्या अनेक गोष्टींचा वापर लोकांना खूप आवडला. उदा - संगीत सौभद्र मधील तुळशी वृंदावन, फिडेल वाद्याचा उपयोग इ. 

केशवराव प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले जेव्हा त्यांनी १९२१ साली संयुक्त मानापमान नाटकात बालगंधर्व यांच्याबरोबर काम केले. मामा वारेरकर यांच्या संगीत संन्याशाचा संसार ह्या नाटकातील केशवरावांची भूमिका अविस्मरणीय आहे. राजश्री शाहू महाराज यांच्या विनंतीनुसार त्यांनी संगीत मृच्छकटिक ह्या नाटकाचा प्रयोग कोल्हापूर महालाच्या प्रांगणात सदर केला. संगीत नाटकांमधील त्यांच्या अथक योगदानामुळे त्यांना संगीतसूर्य म्हणून नावाजले गेले. त्या आधी म्हणजे १९१३ साली गेझेट ऑफ इंडियाचे संपादक गोर्डन यांनी केशवरावांचा महावस्त्र आणि सुवर्णपदक देवून गौरव केला होता. १९२१ सालची संगीत शाह शिवाजी नाटकातील शिवाजी महाराजांची भूमिका हि त्यांच्या आयुष्यातील शेवटची भूमिका होती. केशवराव फक्त ३१ वर्ष जगले. मा.केशवराव भोसले यांचे ४ ऑक्टोबर १९२१ रोजी निधन झाले. लोकमत समूहातर्फे मा.केशवराव भोसले यांना आदरांजली
 
संदर्भ.विकिपिडीया