Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ग्रहण' मालिका घेणार रसिकांचा निरोप,ही नवीन मालिका येणार रसिकांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 15:20 IST

या मालिकेच्या जागी आता नवी मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे.शंभर भागांचीच मर्यादित कथा असलेली ‘बाजी’ ही नवीन मालिका दाखवली जाणार आहे.

ठळक मुद्दे‘ग्रहण’ मालिकेचे चित्रीकरण गेल्या महिन्यातच पूर्ण झाले आहेशंभर भागांचीच मर्यादित कथा असलेली ‘बाजी’ ही नवीन मालिका रसिकांच्या भेटीला येणारमालिकेचे कथानक ऐतिहासिक धर्तीवरील असले तरी कथा पूर्णपणे काल्पनिक आहे

छोट्या पडद्यावरील 'ग्रहण' मालिकेद्वारे अभिनेत्री पल्लवी जोशी छोट्या पडद्यावर कमबॅक केले होते. या मालिकेत पल्लवी जोशी यांचा हटके आणि अनोखा अंदाज पाहायला मिळाला.आता रसिकांची हिरमोड होणारी बातमी आहे. ग्रहण ही  मालिका छोट्या पडद्यावरुन लवकरच रसिकांचा निरोप घेणार आहे.‘ग्रहण’ मालिकेचे चित्रीकरण गेल्या महिन्यातच पूर्ण झाले असून या आठवड्याच्या अखेरीस ही मालिका संपणार आहे.  

या मालिकेच्या जागी आता नवी मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे.शंभर भागांचीच मर्यादित कथा असलेली ‘बाजी’ ही नवीन मालिका दाखवली जाणार आहे. पेशवाईच्या उत्तरार्धात मराठेशाही संपवण्यासाठी इंग्रजांनी निजामाशी हातमिळवणी केली होती. त्या काळाचा संदर्भ घेऊन ‘बाजी’ची काल्पनिक कथा लिहिण्यात आली आहे. त्या वेळी ‘शेरा’ नावाच्या एका हेराला पेशवाईत पाठवण्यात आले होते आणि पेशव्यांना संपवण्यासाठी त्याला शंभर दिवसांची मुदत देण्यात आली होती, असे या मालिकेचे कथानक आहे. मालिकेचे कथानक ऐतिहासिक धर्तीवरील असले तरी कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. त्याकाळी घडलेल्या काही वास्तव घटनांचा संदर्भ मात्र घेण्यात आला आहे, असे ‘झी मराठी’चे व्यवसाय प्रमुख नीलेश मयेकर यांनी सांगितले.

"आम्ही सातत्याने मालिकांच्या बाबतीत वेगळे प्रयत्न केले आहेत. ‘बाजी’ हाही एक अनोखा प्रयत्न आहे. त्या वेळी पुण्यात तळ्यातील गणपती चोरीला गेला होता, त्यानंतर तळेगावातील पेशव्यांच्या गोदामांना आग लावण्यात आली होती, कात्रजच्या तलावात विष टाकण्यात आले होते, अशा काही घटनांचा संदर्भ घेत ही कथा गुंफण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. या मालिकेसाठी स्पेशल इफेक्ट्साचा भरपूर वापर करण्यात आला आहे. सासवड, भोरचा वाडा अशा ठिकाणी चित्रीकरण करण्यात आले असून मालिकेचे सत्तर टक्के चित्रीकरण पूर्ण झाले आहे. ऑगस्टमध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या प्रेक्षकांना मर्यादित भागांच्या मालिका आवडतात. त्यामुळे नवनवीन कथा, मांडणी असलेल्या मर्यादित मालिका देण्याचाच आम्ही प्रयत्न करतो. काही प्रेक्षकांना दीर्घ मालिकाही आवडतात पण सासू-सुनांचा विषय मागे टाकून काहीतरी वेगळा विषय मांडणाऱ्या मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळतील", असे मयेकर यांनी सांगितले. 

टॅग्स :पल्लवी जोशी