Join us

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी शासकीय अनुदान मंजूर

By संजय घावरे | Updated: November 23, 2023 19:33 IST

सरकारने अनुदान मंजूर केल्याने १००वे नाट्य संमेलनाच्या कामाला गती मिळणार आहे.

मुंबई - नाट्यसृष्टीसह संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता असलेल्या १००व्या नाट्य संमेलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या संमेलनासाठी राज्य सरकारकडून ९,३३,९६,००० कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यात आल्याचे एका अधिसूचनेद्वारे जाहिर केले आहे.

११ जून २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला प्रतिवर्षी ५० लाख रुपये अनुदान देण्यात येत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेमार्फत २०१९-२०मध्ये १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे आयोजन करण्यात येणार होते. यासाठी मार्च २०२० च्या अर्थसंकल्पिय भाषणात १०० व्या मराठी नाट्य संमेलनाला १० कोटी रुपये अनुदान वितरीत करण्याबाबत तत्कालीन वित्तमंत्र्यांनी घोषणा केली होती; परंतु त्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे होऊ न शकलेले १००वे नाट्य संमेलन यंदा होणार आहे. या करीता राज्य शासनाकडून ९,३३,९६,०००/- रुपये अनुदान वितरीत करण्यासाठी शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत असल्याचे जाहिर करण्यात आले आहे. यासाठी २३ मे २०१८ रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे अनुदान मंजूरी बाबतच्या अटी व शर्ती राहणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

सरकारने अनुदान मंजूर केल्याने १००वे नाट्य संमेलनाच्या कामाला गती मिळणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने मराठी रंगभूमी दिनाच्या दिवशी १००व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये संमेलनाची मुहूर्तमेढ रोवण्यात येणार होती, पण काही कारणास्तव तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. लवकरच या कार्यक्रमाच्या संदर्भातील तसेच १००व्या नाट्य संमेलनाशी निगडीत असलेली अधिकृत माहिती देण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सांगितले आहे.