Join us

अशोक सराफ यांना मिळाले वाढदिवसाचे गिफ्ट

By admin | Updated: June 7, 2017 02:48 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अशोक सराफ यांचा नुकताच ४ जूनला वाढदिवस झाला.

मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अशोक सराफ यांचा नुकताच ४ जूनला वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेंटीमेंटल या चित्रपटाचे पोस्टर लेखक-दिग्दर्शक समीर पाटील यांनी प्रेक्षकांच्या भेटीस आणले. समीर पाटील यांनी ‘पोस्टर बॉईज’ आणि ‘पोस्टर गर्ल्स’ यांसारख्या दोन हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या दोन यशस्वी चित्रपटानंतर आता ‘शेंटीमेंटल’ हा चित्रपट ते घेऊन येत आहेत. या चित्रपटात अशोक सराफ प्रमुख भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अशोक सराफ आपल्याला हवालदाराच्या वेषात पाहायला मिळत आहेत. हा वेष अशोक सराफ यांच्यासाठी खरेच खूप खास आहे. १९७५ मध्ये त्यांच्या करियरची सुरुवात ‘पांडू हवालदार’ या चित्रपटाने झाली होती. या चित्रपटातील त्यांची हवालदारची भूमिका खूप गाजली होती आणि आज ४२ वर्षांनंतर ‘शेंटीमेंटल’ या चित्रपटात ते हवालदाराच्या भूमिकेतून बढती घेऊन सहायक पोलीस उपनिरीक्षकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात ते प्रल्हाद घोडके ही भूमिका साकारणार आहेत. अशोक सराफ यांचा अभिनय आणि संवाद शैलीतील ‘अचूक टायमिंग’ याला संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीत तोड नाही. त्यामुळेच गेली ४०-४५ वर्षं आपल्या चाहत्यांना खळखळून हसवणाऱ्या अशोक सराफ यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ‘शेंटीमेंटल’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. विनोदाचे अनभिषिक्त बादशहा असलेल्या अशोक सराफ यांना या पोस्टरद्वारे एक प्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.