Join us

कॉलेज से निकलो

By admin | Updated: May 14, 2016 01:09 IST

प्रथमेशने ‘बालक पालक’ या चित्रपटात शाळेत जाणाऱ्या मुलाची भूमिका साकारली होती. नंतर त्याने ‘टाइमपास’मध्ये कॉलेजवयीन मुलाची भूमिका साकारली होती

प्रथमेशने ‘बालक पालक’ या चित्रपटात शाळेत जाणाऱ्या मुलाची भूमिका साकारली होती. नंतर त्याने ‘टाइमपास’मध्ये कॉलेजवयीन मुलाची भूमिका साकारली होती. आता तो ‘३५ टक्के काठावर पास’ या चित्रपटात पुन्हा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलाची भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिका पाहता तो कॉलेजमधून बाहेर कधी पडणार, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे.अभिनेता प्रथमेश परबने ‘बालक पालक’ या चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने या चित्रपटात एका पौगंडावस्थेत नुकत्याच पदार्पण केलेल्या मुलाची भूमिका साकारली होती. त्याची या चित्रपटातील टपोरी मुलाची भूमिका खूप गाजली होती. या चित्रपटानंतर त्याने ‘टाइमपास’ या चित्रपटात काम केले. ‘टाइमपास’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगलाच गल्ला जमवला. या चित्रपटाने तर त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. आजही त्याची ओळख ‘दगडू’ हीच आहे. पण या चित्रपटानंतर तो त्याच-त्याच प्रकारच्या भूमिका करायला लागला असल्याचे वाटायला लागले आहे; आणि त्यातही तो कॉलेजला नुकताच जायला लागलेल्या युवकाची भूमिका अधिक प्रमाणात साकारतो. दरम्यानच्या काळात ४-५ वर्षे लोटून गेली असली तरी त्याच्या भूमिका काही बदलल्या नाहीत. हे सगळे पाहता प्रथमेश कधी मोठा होणार हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे. प्रथमेशने त्याच्या खऱ्या आयुष्यात कधीच कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले आहे. पण तो आजही चित्रपटांमध्ये कॉलेजवयीन मुलगाच पाहायला मिळतो आहे. प्रथमेश एक अभिनेता म्हणून खूप चांगला आहे. पण तो एकाच प्रकारच्या भूमिका साकारत आहे. प्रथमेशने एखाद्या मॅच्युअर्ड मुलाची भूमिका साकारायला हरकत नाही. त्याच्या फॅन्सनाही त्यांच्या लाडक्या प्रथमेशला एका वेगळ्या भूमिकेच पाहण्याची नक्कीच इच्छा असेल. एखाद्या आॅफिसमध्ये काम करणारा, अतिशय समंजस अशा मुलाच्या भूमिकेत प्रथमेश नक्कीच त्याची छाप उमटवू शकतो यात काहीच शंका नाही. त्यामुळे प्रथमेशने आता कॉलेजमधून बाहेर पडून बाहेरच्या जगात डोकवावे असे नक्कीच वाटते. चांगल्या मार्काने पास झाला नाहीस तरी चालेल, तू ‘३५ टक्के काठावर पास’ हो... पण कॉलेजमधून बाहेर पड असेच त्याला सांगावेसे वाटते.