हॉलिवूड अभिनेत्री Gal Gadot हिने या वर्षाच्या सुरुवातीला तिच्या चौथ्या बाळाला जन्म दिला. २०२४च्या सुरुवातीलाच मुलगी झाल्याची गुडन्यूज तिने चाहत्यांबरोबर शेअर केली होती. पण, तिची प्रेग्नंन्सी मात्र अजिबातच सोपी नव्हती. प्रेग्नंन्सीच्या आठव्या महिन्यात मेंदूत रक्ताच्या गाठी आढळल्याने तिला सर्जरी करावी लागली होती.
Gal Gadot ने तिच्या सोशल मीडियावरुन प्रेग्नंन्सीचा हा अनुभव सांगितला आहे. तिने सोशल मीडियावरुन नवजात मुलीबरोबरचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने पोस्ट लिहिली आहे. "या वर्षात अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. माझा हा अनुभव शेअर करत मी याबाबत जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. फेब्रुवारीमध्ये प्रेग्नंन्सीच्या आठव्या महिन्यात मला हे समजलं की माझ्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्या आहेत. काही दिवस मला भयानक डोकेदुखी होत होती. जेव्हा MRI केला तेव्हा हे समोर आलं. आयुष्य किती नाजूक आहे, हे त्या क्षणी कळलं. मला फक्त जीवंत राहायचं होतं आणि जगायचं होतं", असं Gal Gadot ने म्हटलं आहे.
पुढे ती म्हणते, "आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्यानंतर काहीच वेळात तातडीने सर्जरी केली गेली. माझ्या मुलीचा जन्मही तणावात झाला. आज मी यातून पूर्णपणे बरी झाली आहे. आणि मला माझं आयुष्य परत मिळालं आहे. शरीरात होणाऱ्या छोट्याशा गोष्टींकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे".