Join us

'रॉकी और रानी..'नंतर हिंदी सिनेमांसाठी विचारणा झाली का? क्षिती जोग म्हणाली- "खूप ऑफर्स आल्या पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 20:05 IST

रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमानंतर हिंदी सिनेमांच्या आलेल्या ऑफर्सबद्दल क्षिती जोगने तिचं मत मांडलंय

क्षिती जौग ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. क्षितीला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. क्षितीने गेल्या काही वर्षांमध्ये हिंदी सिनेमे आणि मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. क्षितीने २०२३ साली आलेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात रणवीर सिंगच्या आईची भूमिका साकारली होती. या सिनेमानंतर क्षितीला हिंदी सिनेमांच्या ऑफर्स आल्या का, याबद्दल तिने तिचं मत मांडलंय.

अमोल परचुरेंच्या कॅचअप चॅनलला दिलेल्या मुलाखतीत क्षिती म्हणाली की, "रॉकी और रानी.. सिनेमानंतर हिरोच्या आईच्या ऑफर खूप आल्या. पण रॉकी और रानी..मध्ये मी जे कॅरेक्टर साकारलेलं त्याचा स्वतःचा ग्राफ खूप होता. मला आईची भूमिका करायला काही प्रॉब्लेम नाहीय. पण त्यात काहीतरी परफॉर्म करायला मिळालं पाहिजे. रॉकी और रानी.. रिलीज झाल्यावर बहुतेक सगळ्या आयांच्या भूमिका मीच करायच्या इतके फोन मला आले. हिंदी सिनेमाचे स्पेशली. पण त्यात गंमत नाही वाटली मला."

क्षिती पुढे म्हणाली की, "तिकडे मला पैशांसाठी भूमिका नाही करायच्या आहेत हे माझं ठरलंय. त्यामुळे मी वाट बघायला तयार आहे. मला काहीही घाई नाहीये. मी शेवटपर्यंत काम करत राहणारेय. पण ते काम मला आवडलं पाहिजे. रॉकी और रानी..मधल कॅरेक्टर मला इतकं आवडलं. किंवा मिसमॅच वेबसीरिजमध्ये मी जी भूमिका साकारतेय ती वेगळी आहे. रॉकी और रानी..नंतर खूप ऑफर आल्या हिरो की माँच्या. पण त्या भूमिका टिपिकल होत्या. एकूणच मला हिंदी सिनेमा करायची काही घाई नाहीये."

टॅग्स :बॉलिवूडरणवीर सिंग