दोन मित्र आणि त्यांची मैत्री...! या धाटणीचे अनेक सिनेमे आपल्याला पाहायला मिळतात. मैत्रीच्या याच विषयावर भाष्य करणाऱ्या सिनेमात ‘अंड्याचा फंडा’ या आगामी चित्रपटाचादेखील समावेश होतो. अध्यास क्रिएशनचे विजय शेट्टीनिर्मित आणि प्रशांत पुजारी तसेच इंदिरा विश्वनाथ शेट्टी सहनिर्मित या सिनेमाचे संतोष शेट्टी यांनी दिग्दर्शन व कथालेखन केले आहे. बालपणाच्या मैत्रीवर आधारित असलेल्या या सिनेमाचे पोस्टर पाहिले असता हा सिनेमा नक्कीच धम्माल आहे, हे लक्षात येते. या पोस्टरमधील अंड्या आणि फंड्या यांच्या भूमिकेमध्ये अथर्व बेडेकर आणि शुभम कदम हे दोन नावाजलेले बालकलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अथर्वने यापूर्वी ‘माय डियर देश’ ‘असा मी अशी ती’, ‘पोर बाजार’ यासारख्या चित्रपटात काम केले असून शुभमने ‘रईस’ या बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. शिवाय, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या बायोपिकमध्ये देखील शुभम झळकला होता. अशा या अभिनयात मुरलेल्या बालकलाकारांच्या ताफ्यात मृणाल जाधवचादेखील समावेश आहे. ‘लय भारी’, ‘तू ही रे’ तसेच हिंदीतील ‘दृश्यम्’ या चित्रपटातून रसिकांच्या पसंतीला उतरलेली ही चिमुरडी ‘अंड्याचा फंडा’ मध्ये काय कमाल करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्याचप्रमाणे दिग्दर्शक संतोष शेट्टी यांची पार्श्वभूमीदेखील कौतुकास्पद आहे. त्यांनी गेली अनेक वर्षे सीआयडी आणि आहट यासारख्या मालिकांचे लिखाण आणि दिग्दर्शन केले असून या सिनेमाच्या माध्यमातून ते प्रथमच मराठीत दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे. शेवटपर्यंत सस्पेन्स खेळवत ठेवणे आणि प्रेक्षकांना विचार करायला लावणे, हा त्यांचा हातखंडा आहे. या चित्रपटातदेखील त्यांची हीच शैली आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच अंबर हडप, गणेश पंडित आणि श्रीपाद जोशी या त्रिकुटाने मिळून सिनेमाची पटकथा आणि संवादाची धुरा सांभाळलेली असल्यामुळे ‘अंड्याचा फंडा’ या चित्रपटामधून दर्जेदार लेखनाची गंमत पाहायला मिळणार आहे. सस्पेन्सची परिपूर्ण मेजवानी असलेला हा सिनेमा मैत्रीचा कोणता फंडा लोकांसमोर घेऊन येणार ते येत्या ३० जूनला सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल.
‘अंड्याचा फंडा’ मांडणार मैत्रीचा गूढ फंडा
By admin | Updated: June 25, 2017 02:48 IST