Join us  

"प्रभू श्रीराम मांसाहारी होते", नयनताराच्या 'अन्नपूर्णी' सिनेमातील डायलॉगवरून वाद, तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 9:05 AM

नयनताराचा 'अन्नपूर्णी' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप

२०२३च्या अखेरीस दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत असलेला 'अन्नपूर्णी : द गॉडेस ऑफ फूड' हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमात नयनतारा शेफच्या भूमिकेत आहे. पण, या सिनेमावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. नयनताराच्या या सिनेमातील काही संवादांमुळे 'अन्नपूर्णी' हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या सिनेमाविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

'अन्नपूर्णी' सिनेमाविरोधात लव्ह जिहादला प्रोत्साहन देणे आणि हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी मुंबईत FIR दाखल करण्यात आली आहे. रमेश सोळंकी यांनी याबाबत ट्वीट करत पोलिसांत तक्रार केली आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांनी यात लक्ष घालत कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे. 

"#antihinduzee आणि #antihindunetflix यांच्याविरोधात मी तक्रार दाखल करत आहे. संपूर्ण जग भगवान श्रीराम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचा आनंद साजरा करत असताना झी स्टुडिओची निर्मिती असलेला 'अन्नपूर्णी' हा हिंदू विरोधी चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला," असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

पुढे त्याने काही मुद्देही मांडले आहेत. "१. एका हिंदू पुजारीची मुलगी बिरयाणी बनवण्यासाठी नमाज पठण करते. २. या चित्रपटातून लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यात आलं आहे. ३. या सिनेमातील अभिनेता अभिनेत्रीला भगवान श्रीरामही मांसाहारी होते असं सांगत मांस खाण्यासाठी प्रवृत्त करतो," असं म्हणत नेटफ्लिक्स आणि झी स्टुडियोने राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या दरम्यान मुद्दाम हिंदुधर्मियांच्या भावना दुखावण्यासाठी हा सिनेमा प्रदर्शित केल्याचा आरोप केला आहे. 

'अन्नपूर्णी' हा सिनेमा १ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. नयनतारा, जय, कार्तिक कुमार अशी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन निलेश कृष्णा यांनी केलं आहे. तमिळ भाषेतील हा सिनेमा हिंदू देवतांच्या बाबतीतील काही वादग्रस्त संवादांमुळे पुन्हा चर्चेत आला आहे.  

टॅग्स :नयनताराTollywoodराम मंदिर