Join us
Daily Top 2Weekly Top 5

ड्रीम कम ट्रू

By admin | Updated: September 26, 2016 01:50 IST

अभिनेता स्वप्निल जोशीने ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेत काही वर्षांपूर्वी काम केले होते. ‘कोण होईल मराठी करोडपती?’

अभिनेता स्वप्निल जोशीने ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेत काही वर्षांपूर्वी काम केले होते. ‘कोण होईल मराठी करोडपती?’ या मालिकेद्वारे तो छोट्या पडद्यावर पुनरागमन करीत आहे. स्वप्निलच्या या नव्या कार्यक्रमाबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा...‘कोण होईल मराठी करोडपती?’ या कार्यक्रमासाठी तुला काही मेहनत घ्यावी लागली का?- या कार्यक्रमासाठी आमच्या संपूर्ण टीमचे १५ दिवसांचे ट्रेनिंग घेण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या तांत्रिक बाजू समजवण्यासाठी हे ट्रेनिंग होते. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमात तुम्हाला कोणतीही स्क्रिप्ट दिली जात नाही. कारण तुमच्यासमोर हॉटसीटवर कोण बसणार, याची कोणालाच कल्पना नसते. त्यामुळे स्पर्धक आणि माझ्यात होणारा संवाद, आमच्या होणाऱ्या गमतीजमती हीच या कार्यक्रमाची स्क्रिप्ट असेल. ‘कौन बनेगा करोडपती?’ कार्यक्रमाचा मी खूप मोठा फॅन होतो. अमिताभ बच्चन ज्या वेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायचे, तेव्हा आपल्यालादेखील असे काहीतरी करायला मिळावे, असे मला नेहमीच वाटायचे. आज माझी ही इच्छा पूर्ण झाल्याचा मला खूप आनंद होत आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमामुळे मला सामान्य लोकांसोबत थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.चित्रपटात, मालिकेत तू एक व्यक्तिरेखा साकारत असतोस, पण पहिल्यांदाच तू स्वप्निल जोशी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेस. याचे काही दडपण तुझ्या मनात आहे का?- मी वयाच्या नवव्या वर्षापासून अभिनय करीत आहे. प्रेक्षकांनी नेहमीच माझ्या भूमिकांवर प्रेम केले आहे, पण मी पहिल्यांदाच कोणतीही भूमिका न साकारता स्वप्निल म्हणून प्रेक्षकांना भेटणार आहे. मी अनेक वर्षे चित्रपटसृष्टीत असलो, तरी आजही एक सामान्य मुलगा आहे. मी लोकांशी बोलताना नेहमीच अतिशय प्रेमाने, आपुलकीने बोलतो. त्यामुळे लोकांना मी अभिनेता न वाटता, त्यांच्या घरातील एक सदस्यच वाटतो. याच गोष्टीमुळे माझ्यावर काहीही दडपण आलेले नाहीये. माझे फॅन्स माझ्यावर खूप प्रेम करतात, याची मला चांगलीच कल्पना आहे. आज मराठीत आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये तुझे नाव घेतले जाते. तू तुझ्या चित्रपटांची निवड करताना कोणत्या गोष्टींना महत्त्व देतोस?- माझ्यासाठी चित्रपटाची कथा ही सगळ्यात महत्त्वाची असते. कथेनंतर चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार आहे? चित्रपटाची निर्मिती कोणाची असेल? तसेच सेटअप कशा पद्धतीचा असेल? या सगळ्या गोष्टींना मी महत्त्व देतो. सगळ्यात शेवटी मी माझ्या भूमिकेचा विचार करतो. कोणत्याही चित्रपटासाठी त्याची कथा ही सगळ्यात महत्त्वाची असते, असे माझे मत आहे.सचिन पिळगावकर यांना तू गुरू मानतोस. त्यांच्यासोबत तू आता एका चित्रपटात झळकणार आहेस. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?- मी या आधी सचिन पिळगावकर यांच्यासोबत काम केले आहे, पण मुख्य भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली नव्हती, परंतु माझी ही इच्छादेखील आज अनेक वर्षांनी पूर्ण झाली आहे. सचिन पिळगावकर यांचे माझ्या आयुष्यात खूप महत्त्व आहे. ते माझे मित्र, मार्गदर्शक सगळे काही आहेत. मी चुकलो, तरी ते माझ्या पाठीशी उभे राहतात. वेळोवेळी मला योग्य तो मार्ग दाखवतात आणि विशेष म्हणजे, मी जसा आहे तसे त्यांनी मला स्वीकारले आहे, ही त्यांची गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडते. तुझ्या आयुष्यात मायरा आल्यानंतर तुझा प्राधान्यक्रम बदलला आहे, याविषयी काय सांगशील?- मायरा झाल्यानंतर मी जवळजवळ ५० दिवसांची सुट्टी घेतली होती. मी आज काहीही काम करीत आहे ते केवळ तिच्या भविष्यासाठी करीत आहे, पण या सगळ्यात तिला वेळ देणेही गरजेचे आहे. त्यामुळे मी ती जन्मल्यानंतर काही दिवस चित्रीकरण न करण्याचा निर्णय घेतला होता. पैसा परत कमावता येतो, पण आपल्या बाळाचे बालपण परत येत नाही. त्यामुळे मी माझा सगळा वेळ तिला देण्याचे ठरवले. तुमचा विश्वास बसणार नाही, पण मी तिची शी, शू काढतो, तिला आंघोळ घालतो, तिला लस द्यायची असेल, तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचे असेल, तर मी त्या दिवशी चित्रीकरण करीत नाही. ज्यांना शक्य असेल, त्यांनी आपल्या बाळाचे सुरुवातीचे दिवस तरी त्याच्यासोबत घालवावेत. यात एक वेगळाच आनंद असतो, असे मी आवर्जून सांगेन.