आयकर उपायुक्त सोनल सोनकावडे यांना "मोरे साँवरे" अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट नवोदित गायिकेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अलीकडे इंटरनॅशनल ह्यूमन राईट्स कौन्सिल तर्फे आयोजित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर नोबेल पुरस्कार २०१७’ सोहळा पार पडला. या सोहळ्यात मुंबई येथील आयकर विभागातील डेप्युटी कमिशनर सोनल सोनकावडे यांना "मोरे साँवरे" अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट नवोदित गायिका म्हणून सन्मानित केले गेले. आयकर उपायुक्त पदाची जबाबदारी सांभाळण्यासोबतच स्वत:तील कलेला वेळ कसा देता? असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या की, माझ्यातील कला ही मला मिळालेली ईश्वरी देणगी आहे. माझ्या कलेच्या प्रवासात माझ्या कुटुंबाचा, सहकाऱ्यांचा आणि वरिष्ठांचा मला असलेला पाठिंबा महत्त्वाचा आहे. त्यांचा हाच पाठींबा मला सतत स्वत:तील कला जोपासण्यास प्रेरणा देतो.बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हणं, सोनल सोनकावडे यांच्याबाबतीत अगदी तंतोतंत खरी ठरते. लहानपणापासूनच त्यांच्यातील धैर्य, जिद्द, चिकाटी, अभ्यासूवृत्ती, कलेचे दर्शन असे गुण सगळ्यांनी हेरले. दहावी-बारावीत मेरीट लिस्टमध्ये झळकणे असो, बी.एस्सी इन मॅथ्समध्ये पदवी प्राप्त करणे असो, १९९८-९९ चा महाराष्ट्र टॅलेंट सर्च पुरस्कार असो, २०००चा नॅशनल टॅलेंट सर्च पुरस्कार असो किंवा बी.ए. इन पॉलिटिकल सायन्स, एम.ए. इन हिस्ट्री, बॅचलर आॅफ जर्नालिझम नाही तर मास्टर आॅफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन अँड टॅक्सेशन असो, असे एक ना अनेक यशाच्या पायऱ्या चढत, २००८-१० मध्ये सोनल उपजिल्हाधिकारी म्हणून रूजू झाल्यात. २०१०पासून त्या मुंबई येथे आयकर उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. शासकीय कार्यभार सांभाळत असताना स्वत:तील कलागुणांना वाव देत सोनल यांनी स्वत:तील लेखनशैली, संगीत कला व अभिनय कलासुद्धा जपली. संगीत क्षेत्रावर असलेल्या प्रेमामुळे त्या नित्यनेमाने संगीताचा रियाज करत, आजही त्यात खंड पडलेला नाही. ‘मोरे साँवरे’ हा सोनल यांचा पहिला म्युझिक अल्बम झी म्युझिकने लॉन्च केला. लिखानातही त्यांची भरीव कामगिरी केली. त्यांच्या लेखनशैलीचे उत्तम उदाहरण असलेले ‘सो व्हॉट?’ हे पुस्तक क्रॉसवर्ड प्रकाशनातर्फे लवकरच प्रकाशित केले जाणार आहे. सोनल लिखित या पुस्तकावर राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे ‘कॉमा’ नावाचा चित्रपट बनवत आहेत. अलीकडे कऱ्हाडे यांनी याची घोषणा केली. सोनल यांचा ‘मोरे साँवरे’ हा अल्बम अतिशय मधुर व नाजूक स्वरांनी सजलेला, उत्कृष्ट अभिनयाने नटलेला, देशासाठी आपले सर्वस्व त्यागणाऱ्या सैनिकांच्या प्रेमकथेला अर्पण केला गेलेला असून संगीत क्षेत्रातील अनेक नामांकित रसिकांकडून नावाजला गेलेला आहे. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी या अल्बमसाठी सोनल यांचे विशेष कौतुक केले आहे. मी सोनलची गाणी ऐकली आहेत. ती खूप उत्कृष्ट गाते, तिला देवाचे वरदान लाभले आहे. तिचा आवाज पार्श्वगायनासाठी उत्तम आहे, असे ते म्हणाले. संगीतकार इस्माईल दरबार यांनीही सोनल यांचा ‘मोरे साँवरे’ अल्बम ऐकल्यावर मनापासून दाद दिली. मी सोनलच्या आवाजाने खूप प्रभावित झालो. सोनलचा संगीतातील रस मी बऱ्याच वर्षांपासून पाहतोय. सोनल संगीत अगदी नम्रपणे शिकतेय. ज्या पद्धतीने तिचा रियाज सुरू आहे, त्यामुळे ती नक्कीच मोठी गायिका होईल, असे ते म्हणाले. ज्येष्ठ गायक रूपकुमार राठोड यांनीही सोनल यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, सोनल नक्कीच कौतुकाची मानकरी आहे. तिचा पहिला अल्बम हा संगीत क्षेत्रातील तिची सुरुवात असली तरी, तिच्या व्यस्त असलेल्या व्यावसायिक कामातून संगीत जोपासणे, हे खरंच मोठे कार्य आहे. ज्येष्ठ अभिनेते बोमन इराणी यांनीही सोनम यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. मी फार आनंदी आहे, की सोनलला हा पुरस्कार मिळला. प्रचंड कष्ट घेऊन सोनलने हे शिखर गाठले आहे. तिचे खरे प्रेम म्हणजे संगीत. गायनावरील तिची निष्ठा खरच वाखाणण्याजोगी आहे. अनेक लोक वास्तविक आयुष्यात आपले छंद विसरून जातात, मात्र सोनलने आपली गायकी व संगीत अजूनही जिवंत ठेवल्याबद्दल तिचे अभिनंदन. मला तुझा खरच गर्व वाटतो, असे ते म्हणाले.
सोनकावडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर नोबेल पुरस्कार
By admin | Updated: April 17, 2017 04:09 IST