चित्रपटांमध्ये एकदमच रफटफ प्रकारच्या भूमिका करणाऱ्या संतोष जुवेकरला प्रेक्षकांनी झेंडा, मोरया, फक्त लढ म्हणा या सिनेमांमध्ये पाहिलेच होते, तर एक तारासारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचेदेखील सर्वत्र कौतुक झाले. आता संतोष पुन्हा एकदा एका वेगळ्या चित्रपटात नव्या स्वरूपाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. संतोषने याबाबत ‘लोकमत सीएनएक्स’ला दिलेल्यो एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सांगितले, ‘मी डॉ. रखमाबाई राऊत या चित्रपटामध्ये काम करीत आहे. एका वेगळ्या विषयावर काम करायला मिळाल्याने मला छान वाटतेय. या चित्रपटात माझ्यासोबत तनिषा चॅटर्जी, प्रसाद ओक, शरद पोंक्षे हे कलाकार आहेत. या सर्व टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. १८३६ची ही पिरिआॅडिक फिल्म असल्याने तेव्हाचा काळ आम्हाला उभा करावा लागला. चांगल्या प्रकारचा एक सिनेमा करण्याची संधी मिळाल्याचे मला समाधान आहे. या चित्रपटाचे काही शूटिंग लंडनमध्ये करण्यात आले असून, काही दिवसांतच तो प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या कथेविषयी जरी संतोषने आता काही खुलासा केलेला नसला, तरी आपल्याला काही दिवसांतच त्याच्या भूमिकेविषयी माहिती मिळेल, पण आता या चित्रपटात हा अॅक्शन हिरो काय कमाल करतोय, याच्या प्रतीक्षेत त्याचे चाहते नक्कीच असतील.’
‘डॉ. रखमाबाई राऊत’मध्ये संतोष जुवेकर
By admin | Updated: July 22, 2016 02:03 IST