दिग्दर्शक प्रियदर्शन (Priyadarshan) हे 'हेरा फेरी', 'हंगामा', 'भूल भुलैय्या', 'दे दना दन' यांसारख्या सुपरहिट सिनेमांसाठी ओळखले जातात. त्यांच्या सिनेमात अक्षय कुमार आणि परेश रावल तर आवर्जुन असतातच. आता त्यांचा 'हेरा फेरी ३' येणार आहे. पण त्याआधी त्यांनी अक्षय कुमार आणि सैफ अली खानसोबत 'हैवान' सिनेमाचं चित्रीकरण सुरु केलं आहे. दरम्यान 'हेरा फेरी ३' नंतर प्रियदर्शन हे बॉलिवूडला अलविदा करतील अशी हिंट त्यांनी दिली आहे.
onmanorama ला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शन यांनी त्यांच्या निवृत्तीची हिंट दिली. ते म्हणाले, "सिनेमांचे सीक्वेल्स बनवणं ही माझी आवडती शैली नाही. मात्र निर्मात्यांनी खूपच विनंती केल्याने मी हेरा फेरी ३ करण्यासाठी तयार झालो. नाहीतर मी सामान्यत: सीक्वेल बनवायला जात नाही. मला तसं काम करायला आवडत नाही. पण मी हेरा फेरी ३ नक्कीच बनवेन कारण निर्माते बऱ्याच काळापासून मला विनंती करत होते."
ते पुढे म्हणाले, "मी नुकतंच अक्षय आणि परेश रावल यांच्यासोबत 'भूत बंगला'चं शूट संपवलं. आता अक्षय आणि सैफसोबत मी 'हैवान' सिनेमा करतोय. त्यानंतर हेरा फेरी ३ करेन. हे सिनेमे पूर्ण झाले की मी बहुदा निवृत्ती घेईन. मी आता थकलोय."
'हैवान' हा प्रियदर्शन यांचा ९९ वा सिनेमा असणार आहे. यामध्ये सुपरस्टार मोहनलाल कॅमिओ करणार असल्याची चर्चा आहे. प्रियदर्शन यांनी मल्याळम आणि हिंदी सिनेमात दमदार कलाकृतीचं दर्शन घडवलं आहे. त्यांचे सिनेमे पाहून प्रेक्षक खळखळून हसले आहेत. आता त्यांनी निवृत्तीचे संकेत दिल्याने चाहते काहीसे निराश झालेत.