ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेले अभिनयसम्राट दिलीप कुमार यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मूत्रपिंड आणि फुप्फुसात संसर्ग झाल्यामुळे दिलीपकुमार यांना शुक्रवारी (१५ एप्रिल) मध्यरात्री लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान दिलीपकुमार रुग्णालयात असल्याचे वृत्त पसरताच चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालय गाठले. त्यामध्ये मि.परफेक्शनिस्ट आमिर खान याचाही सहभाग होता. आमिरने काल रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत विचारपूस केली. आमीरला पाहून दिलीप कुमार यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी या भेटीचा फोटो ट्विटर अकाऊंटवर शेअर करतानाच आमिरचे आभारही मानले. ' अल्लाच्या कृपेने आणि तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांनी मला बरे केले आहे. आमीर माझ्यासोबत वेळ घालवल्याबद्दल धन्यवाद..' असा मेसेजही त्यांनी फोटोखाली लिहीला आहे.
(छायाचित्र - दत्ता खेडेकर)
१५ एप्रिलला दिलीपकुमार यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ताप आणि श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार दिवसांमध्ये दिलीपकुमार यांनी उपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात येत असल्याचे डॉ. जलील परकार यांनी सांगितले. फुप्फुस आणि मूत्रपिंडाचा संसर्ग कमी झाला असला, तरीही घरी गेल्यावर काही पथ्ये पाळावी लागणार आहेत. त्याचबरोबर, त्यांना काही औषधे दिली जाणार आहेत, अशी माहितीही डॉ. परकार यांनी दिली.
Mumbai: Aamir Khan arrived to meet veteran actor Dilip Kumar at Lilavati Hospital y'day, he will be discharged today pic.twitter.com/zYv4Y1WCRl— ANI (@ANI_news) April 21, 2016