बॉलीवूडमध्ये आपल्या वडिलांसोबत काम करणाऱ्या स्टार मुलांच्या चित्रपटांची मोठी यादी बनू शकते. त्या तुलनेत मुलींची संख्या मात्र खूपच कमी आहे. अनेक स्टार कन्या रुपेरी पडद्यापासून अंतर राखूनच आपले आयुष्य जगत आहेत.हेमा मालिनीची मुलगी ईशा देओल हीरोइन बनली, मात्र ईशाची बहीण आहनाला कधी पडद्यावर येण्याची संधी मिळाली नाही. बच्चन परिवारात अभिषेक नायक बनला तर अभिषेकची बहीण श्वेताचे लग्न लवकर झाले आणि ती आपल्या संसारात रमली. याप्रमाणेच ऋषी कपूरची मुलगी रिधिमादेखील पडद्यापासून लांब राहिली. रिधिमाचा भाऊ रणबीर कपूर मात्र मोठा स्टार झाला आहे. अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर नायिका आहे तर दुसरी मुलगी रेहा अद्यापही पडद्याच्या मागेच आहे. राकेश रोशनचा मुलगा हृतिक रोशन सुपरस्टार झाला, मात्र त्याची बहीण सुनयना कायमच फिल्मी दुनियेपासून लांब राहिली. शर्मिला टागोरचा मुलगा सैफ अली खान आणि मुलगी सोहा अली खानने कॅमेऱ्याचा सामना केला आणि चित्रपटात आपले करिअरही बनविले. शर्मिलाची दुसरी मुलगी सबा बँकिंग क्षेत्रात गेली. तिचे या ग्लॅमर जगाशी काही जमले नाही. बोनी कपूरचा मुलगा अर्जुन कपूर नायक झाला. अर्जुनची बहीण अंशुलाने मात्र या क्षेत्रात येण्याचे जाणीवपूर्वक टाळले. ही यादी येथेच संपत नाही. धर्मेंद्रची मुलगी विजयेताला क्वचितच कोणी पाहिले असेल. धर्मेंद्रने आपल्या दिग्दर्शन कंपनीचे नाव आपल्या मोठ्या मुलीच्या नावानेच ठेवले. तिची लहान बहीण अजिताला कुणी कधी सार्वजनिक ठिकाणी बघितले नाही. याप्रमाणेच राजकपूर यांनीदेखील आपल्या तीनही मुलांना नायक बनविले, मात्र मुलगी रीमाला नेहमी ग्लॅमर जगापासून लांब ठेवले. रणजितची मुलगी दिव्यंका, प्रेम चोपडाची मुलगी प्रेरणा (जिचे लग्न नायक शरमन जोशीसोबत झाले) यादेखील कधी पडद्यावर दिसल्या नाहीत.
- anuj.alankar@lokmat.com