'धूम ४' सिनेमाची सध्या खूप चर्चा आहे. आधीच्या तीन यशस्वी भागांप्रमाणे 'धूम ४' सुद्धा सुपरहिट होईल याची खात्री प्रेक्षकांना आहे. 'धूम ४' सिनेमात रणबीर कपूर मुख्य खलनायक साकारणार असल्याच्या बातमीवर जवळजवळ शिक्कामोर्तब झालंय. 'धूम ४'मध्ये आधीच्या तिन्ही पार्टप्रमाणे पोलिसांच्या भूमिकेत अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा दिसणार नाहीत असं बोललं जातंय. 'धूम ४'मध्ये कोणते कलाकार दिसणार, याच्या कास्टिंगबद्दल खुलासा झालाय.
'धूम ४'मधील कास्ट फायनल
मीडिया रिपोर्टसनुसार, अभिषेक बच्चनच्या ऐवजी 'धूम ४'मध्ये विकी कौशल झळकणार आहे. विक्की एसीपी जय दीक्षितची भूमिका साकारणार आहे. अर्थात याविषयी अधिकृत घोषणा अजून झाली नाहीये. याशिवाय उदय चोप्रा सुद्धा अलीच्या दिसणार नसल्याचं सांगितलं जातंय. उदय चोप्राच्या भूमिकेत कोण दिसणार याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. दरम्यान विकी आणि रणबीर सध्या 'लव्ह अँड वॉर'मध्ये एकत्र काम करत आहेत.
'धूम ४' कधी रिलीज होणार?
यशराज फिल्मसची निर्मिती असलेला 'धूम ४' सिनेमा सध्या प्राथमिक स्तरावर आहे. सध्या या सिनेमात कोणते कलाकार झळकणार याविषयी बोलणी सुरु आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन कोण करणार, याविषयीही अद्याप नाव निश्चित नाही. 'धूम ४'चं प्री प्रॉडक्शनचं काम अंतिम टप्प्यावर आलं आहे. ते झालं की यावर्षी शूटिंगला सुरुवात होऊन पुढील वर्षी २०२६ साली 'धूम ४' सिनेमा रिलीज होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आधीच्या तीन भागात जॉन अब्राहम, हृतिक रोशन, आमिर खान या तीन कलाकारांनी खलनायकाची भूमिका साकारली.