'धडक २' सिनेमाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती. "एक था राजा, एक थी रानी, जात अलग थी, खत्म कहानी", अशा टॅगलाईनच्या अंतर्गत 'धडक २'ची घोषणा करण्यात आली होती. सिद्धांत चतुर्वेदी, तृप्ती डिमरी या कलाकारांची सिनेमात प्रमुख भूमिका होती. अशातच नुकतंच 'धडक २'चा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये जातव्यवस्थेचं भीषण वास्तव समोर आलंय. साधारण ३ मिनिटांचा हा ट्रेलर अंगावर शहारा आणणारा आहे.
'धडक २' सिनेमाचा ट्रेलर
'धडक २' सिनेमात दिसतं की, तृप्ती आणि सिद्धांत एकाच कॉलेजमध्ये शिकत असतात. कॉलेजमध्ये सिद्धांतची खिल्ली उडवली जाते पण तृप्ती त्याला सपोर्ट करते. दोघांची मैत्री होते. मैत्रीचं रुपांतर प्रेमात होतं. परंतु या प्रेमाला जातीचं ग्रहण लागतं. सिद्धांत आणि तृप्तीचं आंतरजातीय प्रेमप्रकरण समोर येताच दोघांनाही खूप त्रास सहन करावा लागतो. इतकंच नव्हे सिद्धांतच्या कुटुंबियांनाही त्रास आणि मारहाण सहन करावी लागते. ट्रेलरमधील शेवटचं दृश्य अंगावर काटा आणणारं आहे. सिद्धांतला साखळदंडांनी रेल्वे रुळावर बांधलं जातं. त्यातच समोरुन एक ट्रेन येताना दिसते.
'धडक २' सिनेमा १ ऑगस्टला रिलीज होणार आहे. धर्मा प्रॉडक्शन, करण जोहरने या सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमाचा ट्रेलर भन्नाट असून सिनेमाही चांगलाच असेल अशी सर्वांना आशा आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तृप्ती आणि सिद्धांत प्रथमच एकत्र काम करत आहेत. 'धडक' हा सिनेमा मराठीतील ब्लॉकबस्टर सैराटचा रिमेक होता. 'धडक २'मध्ये सिद्धार्थ आणि तृप्तीसोबत इतरही लोकप्रिय कलाकार पाहायला मिळणार आहेत.