Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील दशावतारी कलाकाराचं भाग्य उजळलं! 'दशावतार'मध्ये केलं काम, म्हणाला- "या चित्रपटामुळे..."

By कोमल खांबे | Updated: September 19, 2025 11:44 IST

'दशावतार' सिनेमात खऱ्या आयुष्यात दशावतारमध्ये काम केलेले काही कलाकारही झळकले आहेत. अशाच एका कलाकाराने सिनेमाबाबत पोस्ट शेअर केली आहे. 

Dashavatar: 'दशावतार' या मराठी सिनेमाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. या सिनेमातून कोकणातील परंपरा आणि दशावतार या लोककलेची झलक प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली. लोककलेचा आधार घेऊन अत्यंत गंभीर विषयाला 'दशावतार' सिनेमातून हात घातला गेला आहे. दिलीप प्रभावळकर आणि इतर कलाकारांच्या भूमिकेचंही सर्वत्र कौतुक होत आहे. 'दशावतार' सिनेमात खऱ्या आयुष्यात दशावतारमध्ये काम केलेले काही कलाकारही झळकले आहेत. अशाच एका कलाकाराने सिनेमाबाबत पोस्ट शेअर केली आहे. 

दशावतारी कलाकार असलेला यश जळवी याने 'दशावतार' सिनेमात काम केलं आहे. याबाबत त्याने पोस्ट लिहिली आहे. यश पोस्टमध्ये म्हणतो, "सांगायला खूप आनंद होतोय कारण नुकतंच १२ सप्टेंबर रोजी मराठी चित्रपटसृष्टीतला एक आगळा वेगळा असा 'दशावतार' सिनेमा प्रदर्शित झालाय. या चित्रपटात मी स्वत: काम केलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीतले एक अनमोल रत्न आणि हरहुन्नरी कलाकार म्हणजे आदरणीय दिलीप प्रभावळकर सर, भरत जाधव सर, महेश मांजरेकर सर, प्रियदर्शिनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे यांसारख्या अनेक ग्रेट कलाकारांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली हे तर माझं खूप मोठं भाग्य आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर सर आणि लेखक गुरू ठाकूर सर यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो". 

"या चित्रपटामुळे खरोखरंच माझ्या या दशावतार कलेने एक वेगळी उंची गाठली आहे. अनेक रसिक मायबाप, नाट्यप्रेमी, माझे चाहते, मित्रपरिवार आणि नातलग मंडळी माझ्या कलेचं भरभरुन कौतुक करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप साऱ्या चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. शुभेच्छा मिळत आहेत. या सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो. तुम्हा सर्वांचं माझ्यावरचं आणि माझ्या या दशावतार कलेवरचं प्रेम असंच कायम राहू दे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद नेहमीच पाठीशी राहू दे", असं पुढे त्याने म्हटलं आहे. 

यश जळवी हा खऱ्या आयुष्यातही दशावतारी कलाकार आहे. अनेक दशावतारचे प्रयोग त्याने केले आहेत. दशावतारचे प्रयोग करताना यश स्त्री पात्राची भूमिका साकारतो. त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या कामाच्या अनेक पोस्ट शेअर केलेल्या दिसतात. 

टॅग्स :दिलीप प्रभावळकर मराठी अभिनेतासिनेमा