भारतीय क्रिकेटर विनोद कांबळी सध्या चांगलेच चर्चेत आहेत. शनिवारी विनोद कांबळींची तब्येत बिघडली आणि त्यांना ठाण्यातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आता त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. क्रिकेटर असलेल्या विनोद कांबळींच्या करिअरमध्ये एका रोलरकोस्टर राइडसारखे चढ-उतार दिसले. क्रिकेटमध्ये विनोद कांबळींना पुढे खेळण्याची तशी संधी मिळाली नाही. अशातच विनोद कांबळींनी कोणे एके काळी बॉलिवूडमध्येही नशीब आजमावलेलं. परंतु तिकडेही ते क्लीन बोल्ड झाले. विनोद कांबळींनी कोणत्या सिनेमांत काम केलेलं? याशिवाय त्यांनी काम केलेल्या सिनेमांचं पुढे काय झालं? जाणून घ्या.
विनोद कांबळींनी या बॉलिवूड सिनेमांमध्ये केलं काम
२००२ साली विनोद कांबळींचा पहिला सिनेमा आला होता. या सिनेमाचं नाव 'अनर्थ'. या सिनेमात विनोद यांच्यासोबत संजय दत्त, सुनील शेट्टी, गौतम रोडे, आशुतोष राणा अशी तगडी स्टारकास्ट होती. विनोद कांबळींनी या सिनेमात खास भूमिका साकारलेली. परंतु नावाप्रमाणेच सिनेमाची अवस्था झाली. अवघ्या ४ कोटींची कमाई करणारा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला.
त्यानंतर २००९ साली आलेल्या 'पल पल दिल के पास' सिनेमात विनोद कांबळी दिसले होते. परंतु हा सिनेमाही चालला नाही. पुढे बॉलिवूडनंतर विनोद कांबळींनी साउथ मनोरंजन विश्वात मजल मारली. Bettanagere या साउथ सिनेमात त्यांनी काम केलं. परंतु हा सिनेमाही विशेष काही चालला नाही. अशाप्रकारे क्रिकेटच्या करिअरमध्ये 'विकेट' अनुभवलेले विनोद कांबळी नंतर बॉलिवूडमध्येही 'क्लीन बोल्ड' झाले.
टीव्ही इंडस्ट्रीतही दिसले विनोद कांबळी
बॉलिवूडचं करिअर फ्लॉप झाल्यावर विनोद कांबळींनी २००४ साली 'मिस इंडिया' नावाच्या मालिकेतही काम केलं होतं. परंतु या मालिकेमुळेही विनोद कांबळींना म्हणावा तसा फायदा झाला नाही. त्यानंतर बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनमध्ये विनोद कांबळी दिसले होते. याशिवाय 'कॉमेडी सर्कस २०-२०' आणि 'कॉमेडी नाइट्स बचाओ' या रिअॅलिटी शोमध्ये विनोद कांबळी यांनी सहभाग घेतला. परंतु मनोरंजन विश्वातही विनोद कांबळी यांच्या पदरी निराशाच आली. सध्या विनोद कांबळी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून ते ठणठणीत बरे होऊन पुन्हा सक्रीय होतील, अशी सर्वांना आशा आहे.