होय, तुम्ही ऐकता ते खरे आहे. सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’ या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान लवकरच रणवीरसिंह याच्यासोबत काम करताना दिसणार आहेत. कबीर खान सध्या ‘ट्युबलाईट’मध्ये बिझी आहेत. याचे काम संपताच रणवीरसोबत एका नव्या प्रोजेक्टवर ते काम सुरू करणार असल्याची बातमी आहे. या वर्षाच्या अखेरीस वा नव्या वर्षाच्या सुरुवातीला या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणे अपेक्षित आहे. बऱ्याच दिवसांपासून कबीर खान ‘अजहर’, ‘एम. एस. धोनी-दी अनटोल्ड स्टोरी’ या शृंखलेतील क्रिकेट या विषयाला वाहिलेला चित्रपट घेऊन येणार, अशी चर्चा होती. अखेर ही चर्चा सत्यात उतरताना दिसते आहे. सन १९८३मध्ये भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या या संघाने भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. हीच विजयगाथा पडद्यावर दिसणार असून, कबीर खान हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीरने या चित्रपटासाठी होकार कळविला आहे. रणवीर सध्या संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’मध्ये बिझी आहे. ‘पद्मावती’चे शूटिंग हातावेगळे केल्यानंतर तो या चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्याची शक्यता आहे. एकंदर काय, तर कबीर यांच्या आगामी चित्रपटात रणवीर कपिल देवची भूमिका साकारताना दिसेल. या चित्रपटात भारतीय संघाची विजयगाथा दिसणार असल्याने निश्चितपणे कपिल देव यांच्यासोबत श्रीकांत, मदनलाल, मोहिंदर अमरनाथ, सुनील गावसकर यासारखे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले अन्य खेळाडूही पडद्यावर दिसतील. त्यांची भूमिका कोण वठवणार, हेही लवकरच कळेल.
कबीर खानसोबत रणवीर खेळणार ‘क्रिकेट’!
By admin | Updated: November 17, 2016 06:05 IST