Sundara Manamadhe Bharli : 'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' (Sundara Manamadhe Bharli) ही मालिका प्रचंड गाजली होती. अगदी अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. जवळपास अडीच वर्ष या मालितेने रसिकांचं मनोरंजन केलं. अभिनेत्री अक्षया नाईक (Akshaya Naik) तसेच समीर परांजपे मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. त्या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री देखील प्रेक्षकाना आवडली होती. मालिकेत अक्षया नाईकने लतिका नावाचं पात्र साकारलं होतं तर समीर परांजपे अभिमन्यूच्या भूमिकेत दिसला. या मालिकेने जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मालिकेची क्रेझ अजूनही कायम आहे. दरम्यान, सोशल मीडियावर नुकताच कलर्स मराठी 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.
अक्षया नाईक आणि समीर परांजपे यांची मुख्य भूमिका असेलली ही मालिका पुन्हा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. कलर्स मराठी वाहिनीने सोशल मीडियावर याची माहिती देत कॅप्शनमध्ये लिहिलंय, "लतिका आणि अभिमन्यूची भन्नाट लव्हस्टोरी पुन्हा एकदा येतेय तुमच्या भेटीला!" त्यामुळे प्रेक्षक देखील उत्सुक झाले आहेत. 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका येत्या २३ डिसेंबरपासून दुपारी २ वाजता 'कलर्स मराठी'वर प्रसारित केली जाणार आहे.
'कलर्स मराठी' वाहिनीने ही मालिका पुन: प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचं प्रेक्षक सुद्धा कौतुक करताना दिसत आहेत.