ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - ब्रिटिश रॉक बँड कोल्ड प्ले ग्लोबल सिटिझन फेस्टिवल अंतर्गत भारतामधली पहिलीच कॉन्सर्ट मुंबईमध्ये करण्यास सज्ज झाली आहे. जगभरातून दारीद्र्याचं उच्चाटन व्हावं यासाठी राबवण्यात येणाऱ्या मोहीमेचा ही कॉन्सर्ट हा एक भाग असून येत्या 19 नोव्हेंबर रोजी मुंबईत ही कॉन्सर्ट होणार आहे. यामध्ये आमीर खान, ए. आर. रेहमान, रणवीर सिंग, कतरीना कैफ, फरहान अख्तर, श्रद्धा कपूर, अर्जून कपूर, अरिजीत सिंह असे अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत.
शिक्षण, समानता, स्वच्छता आदी समाजोपयोगी अभियानांच्या माध्यमातून दर्शकांनी तिकिटे मोफत प्राप्त करावीत अशी योजना आखण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यू यॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये ग्लोबल सिटिझन फेस्टिवलमध्ये भाषण केले होते. त्यानंतर, हा उपक्रम भारतातही आणण्याच्या दृष्टीने हालचाली घडल्या.
याआधी मुंबईमध्ये मायकेल जॅक्सनचा शो करणाऱ्या विझक्राफ्ट ही कंपनी या कॉन्सर्टची सहनिर्माती आहे.
कोल़्डप्लेमधल्या एका गाण्यासाठी भारताच्या विविध भागांमध्ये चित्रीकरण करण्यात आलं असून त्यात सोनम कपूर झळकली आहे. ग्लोबल सिटिझनचं हे भारतातलं पहिलं वर्ष असून शिक्षण, समानता, पिण्याचे स्वच्छ पाणी, मल:निसारमाची व्यवस्था अशा विविध गोष्टींवर भर देण्यात येत आहे.
दी ग्लोबल एज्युकेशन अँड लीडरशिप फाउंडेशनचा भर जगामध्ये सहकार्य वाढावं यासाठी ध्येयवादी नेतृत्वाच्या घडणीला प्रोत्साहन देण्यावर आहे. सध्या 14 देशांमधल्या 2.5 दशलक्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यात यश आले असून जवळपास एक लाख शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आलं आहे.
ग्लोबल सिटिझन फेस्टिवलमध्ये मराठी मीडिया पार्टनर म्हणून लोकमतचा सहभाग आहे.