Join us

Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?

By देवेंद्र जाधव | Updated: September 23, 2024 12:03 IST

Coldplay बँडची भारतात इतकी क्रेझ का आहे? या बँडची तिकिटं मिळाल्याने लोक निराश झाले असल्याच्या घटना घडल्या आहेत. जाणून घ्या यामागील कारण (coldplay)

भारतीय जनता संगीतवेडी आहे हे नव्याने सांगायची गरज नाही. अनेकदा अरिजीत सिंग, दिलजीत दोसांज यांच्या लाईव्ह कॉन्सर्टला चांगलीच गर्दी होते. बॉलिवूडमधील अनेक कलाकारही या कलाकारांच्या कॉन्सर्टला हजेरी लावत असतात. इतकंच नव्हे तर काही वर्षांपूर्वी आलेल्या जस्टिन बिबरच्या म्यूझिक कॉन्सर्टला सुद्धा चांगलीच गर्दी झालेली. सध्या अशीच चर्चा आहे ती म्हणजे Coldplay या म्यूझिक बँडची. हा बँड भारतात परफॉर्म करणाार आहे असं समजताच क्षणार्धात या बँडची तिकिटं विकली गेली. Coldplay ची भारतात इतकी जबरदस्त क्रेझ का आहे? जाणून घ्या.

Coldplay बँड नेमका काय?

तिकीट विक्री होताच क्षणार्धात Coldplay बँडची तिकिटं विकली गेली. या बँडच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर.. हा एक ब्रिटीश रॉक बँड आहे. १९९७ ला या बँडची स्थापना झाली. या बँडमध्ये पाच जणांची टीम आहे. यामध्ये गिटारीस्ट जॉनी बकलैंड, बासिस्टवादक गाय बेरीमैन, गायक आणि पियानोवादक क्रिस मार्टिन, ड्रमर आणि पर्क्युसिनिस्टवादक विल चैंपियन यांचा समावेश आहे. फिल हार्वे हा या बँडचा मॅनेजर आहे. या बँडमधील कलाकारांनी कॉलेजच्या काळात Coldplay ची सुरुवात केली होती. या बँडचा लाईव्ह परफॉर्मन्स ऐकण्याची तरुणाईमध्ये खूप क्रेझ आहे. या बँडची परफॉर्म करण्याची अनोखी शैली तरुणाईला भुरळ पाडणारी आहे. लोकप्रिय गाण्यामुळे या संगीतक्षेत्रातील मानाच्या ग्रॅमी पुरस्काराने या बँडला सन्मानित केलं गेलंय.

काही क्षणात विकली गेली Coldplay ची तिकिटं

पुढील वर्षी २०२५ मध्ये Coldplay या म्यूझिक बँडचे भारतात तीन शो आहेत. Coldplay ची इतकी क्रेझ आहे की याआधी फक्त १८ आणि १९ जानेवारी २०२५ ला या बँडचे मुंबईत शो होते. परंतु चाहत्यांची जबरदस्त मागणी बघता त्यांनी २१ जानेवारीला सुद्धा या बँडचा शो ठेवला आहे. तीन शो असूनही तिकीट न मिळाल्याने हजारो चाहते निराश झाले आहेत. अजून या शोला चार महिने असूनही बूक माय शोवर या बँडची तिकिटं क्षणार्धात विकली गेली आहेत. इतकंच नव्हे या शोची तिकिटं ब्लॅक करणाऱ्यांचा सुळसुळाट सुरु झालाय.

 

लाखाच्या घरात विकली गेली तिकिटं

ऑनलाईन मार्केट कंपनी वियागोगो या तिकीट सेलिंग प्लॅटफॉर्मवर Coldplay ची तिकिटं ३ लाखांना विकली जात आहेत. या प्लॅटफॉर्मवर ३८ हजारापासून ते ३ लाखापर्यंत या कॉन्सर्टची तिकिटं विकली जात आहेत. एका तिकिटाची किंमत तर साडे सात लाखाच्या घरात आहे. नवी मुंबईतील डी.व्हाय.पाटील स्टेडियमवर हा बँड परफॉर्म करणार आहे. दरम्यान या कॉन्सर्टची अधिकृत तिकीट विक्री Book My Show या प्लॅटफॉर्मवर केली जात आहे. इतर तिकीट प्लॅटफॉर्मवरुन खरेदी केलेली तिकीट वैध मानली जाणार नाही, असं अधिकृत स्पष्टीकरण बुक माय शोने दिलं आहे.

 

टॅग्स :हॉलिवूडसंगीतअरिजीत सिंहदिलजीत दोसांझ