Join us
Daily Top 2Weekly Top 5

सीआयडी या मालिकेच्या फॅन्ससाठी धक्कादायक बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 12:12 IST

सीआयडी ही मालिका 1998 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. इतक्या वर्षांत या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये. या मालिकेचे आजवर 1550 भाग प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत.

सीआयडी ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील एसपी प्रद्युमन, दया, अभिजीत या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य केले. पण आता या मालिकेच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या मालिकेचा शेवटचा भाग 27 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

सीआयडी ही मालिका 1998 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. इतक्या वर्षांत या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये. या मालिकेचे आजवर 1550 भाग प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. पण ही मालिका संपणार असून ही बातमी या मालिकेत दयाची भूमिका साकारणाऱ्या दयानंद शेट्टीनेच एबीपी न्यूजला दिली आहे. दयाने सीआयडी या मालिकेद्वारेच त्याच्या करियरला सुरुवात केली. या मालिकेविषयी एबीपी न्यूजशी बोलताना दयानंद सांगतो, या मालिकेचे निर्माते बी.पी.सिंह यांनी आम्हाला पाचच दिवसांपूर्वी सांगितले की या मालिकेचे चित्रीकरण अनिश्चित कालवधीसाठी थांबवले जाणार आहे. यावेळी सेटवर शिवाजी साटम, आदेश श्रीवास्तव हे सगळेच कलाकार होते. सगळ्यांनाच हे ऐकून प्रचंड आश्चर्याचा धक्का बसला. आमचा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेत आहे यावर आमचा विश्वासच बसत नव्हता. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेसोबत सोनी वाहिनीकडून सावत्र व्यवहार वाढत चालला होता. गेल्या कित्येक दिवसांपासून मालिका ही ठरलेल्या वेळेपेक्षा 10-15 मिनिटे उशिराने सुरू होत होती. यामुळे या मालिकेबाबात वाहिनीची काय भूमिका आहे ते स्पष्ट होत होते. विविध कारणांवरून बी.पी. सिंह आणि वाहिनी यांच्यात सतत तणाव निर्माण होत होता. पण आता हा कार्यक्रम अचानक का बंद होत आहे यामागचे कारण अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही. या मालिकेतील सगळेच कलाकार अनेक वर्षं एकमेकांसोबत काम करत आहेत आणि त्यामुळे आम्ही सगळे एखाद्या कुटंबाप्रमाणेच होतो. या बातमीमुळे सीआयडीवर आजही प्रेम करणाऱ्या फॅन्सविषयी मला खूप वाईट वाटत आहे. 

सीआयडी या मालिकेचा लिम्का बुक रेकॉर्डमध्येही समावेश झाला होता. ही मालिका आजवर सगळ्यात जास्त वर्षं टिव्हीवर प्रक्षेपित झालेली मालिका आहे. 

टॅग्स :सीआयडीशिवाजी साटम