गेल्या शुक्रवारी दिबाकर बॅनर्जीचा ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ प्रदर्शित झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर इंग्रजांना हरवण्यासाठी जपानने कोलकातावर केलेले आक्रमण, वाढता ड्रग्जचा व्यापार, माफिया टोळ्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एकाची घडलेली हत्या या चौकोनात अडकलेला ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ चित्रपट प्रेक्षकांना फारसा रुचला नाही. पहिल्या दिवशी चित्रपटाने ४ कोटींची कमाई केली. तर शनिवार आणि रविवारीही त्यात फारशी चांगली वाढ झाली नाही. त्यामुळे एकूण ३ दिवसांत या चित्रपटाने फक्त १३ कोटींच्या आसपास कमाई केली आहे. सोमवारी तर या कमाईत आणखी घट झाल्याचे समजते. असे असले तरी मागच्या काही दिवसांत एकाही चित्रपटाला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नसल्याने त्याचा फायदा ब्योमकेशला मिळू शकतो. वर्ल्डकप सामन्यांमुळे अनेक चित्रपटांना अपयश मिळत होते. पण त्यानंतर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाकडून अपेक्षा होत्या, ज्या फोल ठरल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे आता आयपीएल सामन्यांचीही सुरुवात होणार असून त्याचाही प्रभाव चित्रपट व्यवसायांवर नक्कीच पडेल, असे जाणकारांनी सांगितले.गेल्या शुक्रवारी ब्योमकेशबरोबर ‘बरखा’ चित्रपट प्रदर्शित झाला. पण पहिल्याच दिवशी त्याची अवस्था वाईट झाली. तर त्याआधी प्रदर्शित झालेल्या ‘हंटर’ चित्रपटाने १० दिवसांनंतर ११ कोटींची कमाई केली. तर ‘दिल्लीवाली जालिम गर्लफ्रेंड’ बॉक्स आॅफिसमधून बाहेर पडला. अनुष्का शर्माच्या ‘एनएच १०’ चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात ३२ कोटींपर्यंत कमाई केली आहे. तर यशराजच्या ‘दम लगाके हईशा’ने ३० कोटींपर्यंत मजल मारली आहे.येत्या शुक्रवारी सनी लिओनचा ‘एक पहेली लीला’ चित्रपट येत असून त्यात ती प्रमुख भूमिकेत आहे. सनीची भूमिका असल्याने हा चित्रपट चालेल, अशी अपेक्षा आहे. तर हिंदू आणि मुस्लिमांवर बनलेला ‘धर्म मे संकट’ या संवदेनशील चित्रपटात परेश रावल, नसीरुद्दीन शाह आणि अनू कपूर यांच्या भूमिका आहेत. तर विधू विनोद चोप्रांचा ‘ब्रोकन हॉर्सेस’ हा इंग्रजी चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.
‘ब्योमकेश’ची कमाई फक्त १३ कोटी
By admin | Updated: April 7, 2015 05:37 IST