Join us

"छत्रपती शिवाजी" सिनेमाचं बजेट 200 करोड

By admin | Updated: May 31, 2017 21:15 IST

छत्रपती शिवाजी महाराज या सिनेमाचं बजेट 200 कोटींपेक्षा जास्त असेल.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 31- आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता रितेश देशमुख आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीतील हायबजेट सिनेमा असेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. 
बीबीसी हिंदी या बेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत  रितेशने या सिनेमाबद्दलच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. शिवाजी महाराज यांच्यासारख्या महान व्यक्तीवर हा सिनेमा बनतो आहे. महाराजांवर फक्त महाराष्ट्राने नाहीतर अख्या भारताने प्रेम केलं आहे. हा सिनेमा माझ्यासाठी अतिशय महत्वाकांक्षी सिनेमा असेल, असं रितेश म्हणाला आहे. या सिनेमाचं बजेट 200 कोटींपेक्षा जास्त असेल. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आधीच ट्विटरवरून सिनेमाच्या बजेटबद्दल सांगितलं होतं. 
सिनेमाच्या बजेटबद्दल रितेश म्हणतो,"सिनेमाचा स्क्रीन प्ले आता तयार झाला आहे. आता प्री प्रॉडक्शनचं काम सुरू होइल आणि त्यानंतर बजेट ठरवलं जाइल. 
बाहुबली सिनेमाच्या यशानंतर छत्रपती शिवाजी महाराज हा सिनेमा बनवला जातो आहे अशी चर्चा खरंतर सुरू होती. त्या चर्चेला रितेशने पूर्णविराम लावला आहे. बाहुबली सिनेमा प्रदर्शित व्हायचा खूप आधी छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा बनवणं निश्चित झालं होतं, अशी माहिती रितेशने दिली आहे.
शिवाजी महाराजांबरोबर लोकांच्या भावना जोडल्या आहेत. अतिशय संवेदनशीलता ठेवून हा सिनेमा बनवला जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे अभिनेता सलमान खान या सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.  
अभिनेता रितेश देशमुख सध्या "बँकचोर" या त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. बँकचोर हा सिनेमा आधी कॉमेडीअन कपिल शर्मा करणार होता पण त्याच्या शोमधून वेळ मिळत नसल्याने कपिलने सिनेमाला नकार दिला होता. कपिल व्यतिरिक्त इतर कुठल्याही अभिनेत्याने हा सिनेमा नाकारलेला असता तरीही मी बँकचोर सिनेमा केला असता, असं रितेशने सांगितलं आहे.