Join us

मराठी स्टार्सची मार्केटमध्येही बूम

By admin | Updated: February 21, 2016 02:12 IST

मराठी फिल्म इंडस्ट्री आणि मराठी स्टार्सची लोकप्रियता आता मार्केटमध्येही सिद्ध होऊ लागली आहे. मार्केटचे नियम हे अत्यंत कठोर असतात. भाव-भावनांना तेथे थारा नसतो. पूर्णपणे व्यावसायिकता

मराठी फिल्म इंडस्ट्री आणि मराठी स्टार्सची लोकप्रियता आता मार्केटमध्येही सिद्ध होऊ लागली आहे. मार्केटचे नियम हे अत्यंत कठोर असतात. भाव-भावनांना तेथे थारा नसतो. पूर्णपणे व्यावसायिकता जपली जाते. तुमची चलती असेल, तरच विचारले जाते. आता खरोखरच मराठी कलाकारांची चलती असल्याचे चित्र आहे. मराठीचा लाडका चॉकलेटबॉय स्वप्निल जोशी याची फॅशन लाइनच लॉँच झाली असून, देशातील एका मोठ्या ब्रॅँडने त्याला यासाठी करारबद्ध केले आहे. मराठीतील अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी, यासारखे तारे अनेक जाहिरातींमध्ये दिसत आहेत. आजपर्यंत फॅशन आयकॉन म्हणून केवळ बॉलीवूडचे तारे ओळखले जायचे. अगदी जुन्या काळात डोकावले तर राजेश खन्नाच्या गुरू शर्टपासून ते साधनाच्या हेअरकटपर्यंत अनेक गोष्टी फॅशन सिम्बॉल बनल्या. याचेच प्रत्यंतर जाहिरातींमध्येही येते. हिंदीमधील टॉप वनची अभिनेत्री जाहिरातीमध्ये दिसेल, अशी एका साबणाची ख्याती आहे. हिंदीतील कलाकारांची लोकप्रियता मोजण्याचे मापही जाहिरातींमधून किती दिसतो, यावर मानले जायचे. मराठी कलाकारांच्या वाट्याला हे भाग्य तसे फारच कमी आले. अगदी एखादे प्रादेशिक उत्पादन किंवा फार तर मराठी उद्योगपतींच्या ब्रॅँडची जाहिरात करताना मराठी कलाकार दिसायचे. त्यातही अनेकदा वैयक्तिक स्नेहाचे संंबंधच असायचे. मात्र, आता मराठी कलाकारांनी स्वत:ला लोकप्रियतेच्या निकषावर सिद्ध केले आहे. बॉलीवूडच्या ताऱ्यांच्या फॅशन लाइनबाबत अनेकदा एकेले असेल. सलमानपास बॉलीवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी तारे-तारकांची स्वत:च्या नावाची क्लॉथिंग फॅशन लाइन आहे. व्रँगलर या फॅशन ब्रँडमध्ये जॉन अब्राहम कलेक्शन आहे, तर हृतिक रोशनने एचआरएक्स ही स्वत:च्या नावाची क्लॉथिंग लाइन सुरू केलीय. सलमान खानची बिइंग ह्युमन तर सर्वज्ञात आहेच. आता या बॉलीवूड सेलेब्सच्या पावलावर पाऊल ठेवत, मराठी अभिनेता स्वप्निल जोशीने ही आपली फॅशन लाइन लाँच केलीय. मराठीत अशा पद्धतीने स्वत:ची क्लोथिंग लाइन सुरू करणारा स्वप्निल हा पहिला मराठी स्टार ठरलाय. स्वप्निलच्या ह्या कलेक्शनचे नाव आहे, ‘स्वप्निल रेकमेंड्स’. स्वप्निलने मुंबई आणि पुण्यात नुकतेच आपले हे कलेक्शन लाँच केलेय. हे कलेक्शन मुंबई, पुणे आणि नागपूरमधल्या मॅक्सच्या स्टोअर्समध्ये आता उपलब्ध होणार आहे, त्याच्या फॅशन लाइनबद्दल सांगताना स्वप्निल म्हणतो, ‘गेले सहा महिने मॅक्स या इंटरनॅशनल ब्रँडला माज्यासोबत असोसिएट व्हायची इच्छा होती, पण त्यांना मी ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून नको होतो, तर त्यांना स्वप्निल जोशी कलेक्शन लाँच करायची इच्छा होती, यावर आम्ही बराच अभ्यास केला. आणि आता स्वप्निल रेकमेन्ड्स नावाने क्लोथिंग रेंज लाँच केलीय. मला अभिमान वाटतो की, एका मराठी अभिनेत्याची त्यांनी निवड केली. याचाच अर्थ, आज मराठी सिनेमाने एक उंची गाठलीय की, आता आंतरराष्ट्रीय ब्रँड्सही आपल्याशी असोसिएट होऊ इच्छितायत.’‘आता याचा अर्थ, माझ्या प्रत्येक सिनेमात मी मॅक्सचे कपडेच घालणार किंवा प्रत्येक पब्लिक इव्हेंट, पार्टी आणि अवॉर्ड फंक्शनमध्ये मी त्यांनीच डिझाइन केलेले कपडे घालणार असा होत नाही. फिल्ममध्ये सिनेमाचे जे डिझाइनर असतील, त्यांच्या निर्णयानुसार वागावेच लागते, तसेच अवॉर्ड आणि पार्टीजमध्ये काही विशिष्ट पद्धतीचे कपडे घालावे लागतात. हे कॅज्युअल वेअर कपड्यांचे कलेक्शन असणार आहे. अशा पद्धतीचे कपडे मी रोज घालतो. त्यामुळे माझ्या चाहत्यांना माझ्यासारखे कपडे या कलेक्शनमुळे आता घालता येतील.’ स्वप्निलला त्याच्या कपड्यांच्या आवडी-निवडीबद्दल विचारल्यावर तो सांगतो, ‘मला काळ्या, पांढऱ्या आणि निळ्या रंगाचे कपडे घालायला खूप आवडतात. त्यामुळे माझ्या पर्सनल कलेक्शनमध्ये त्याच रंगाचे जास्त कपडे आहेत. बरं या कपड्यांची रेंजही चारशे ते दोन हजार मधलीच ठेवलीय. कारण फॅशनेबल आणि फक्त रँपवर घालता येण्याजोगे कपडे डिझाइन करण्यापेक्षा कोणालाही घालायला आवडतील, अशा कपड्यांची क्लॉथिंग लाइन असणं गरजेचं आहे.’बॉलीवूड हिरो व हिरोईनसचे जाहिरात क्षेत्रावर वर्चस्व होते. कारण बॉलीवूड कलाकारांना सर्वच लोक ओळखत असल्याने, जाहीरातदार हिंदी कलाकारांना जाहिरातीमध्ये काम करण्याची संधी देत होते. परिणामी, मराठी कलाकारांना त्या वेळी फार कमी अ‍ॅड आॅफ र्स होत होत्या, परंतु आता चित्र बदले आहे. आता मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार महाराष्ट्रात काय, तर जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आता हिंदी चित्रपटातील हिरोंना रिप्लेस करून आपले मराठमोळी कलाकार जाहिरातींमध्ये झळकत आहेत.  - भूषण प्रधानजाहिरातीचे माध्यम प्रॉडक्टनुसार ठरवले जाते. त्यामुळे एखादे प्रॉडक्ट महाराष्ट्रापुरतेच मर्यादित असेल, तर मराठी सेलिब्रिटी निवडणे हाच पर्याय असतो. जाहिरात करणे फार आव्हानात्मक असते, त्यामुळे हे आव्हान पेलणे खूप मजेशीर असते, तसेच कमी वेळेत पूर्ण प्रॉडक्टची माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे हेदेखील एक आव्हानच असते. जाहिरातीच्या माध्यमातून आंतराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचता येते आणि ही संधी आता इतर बॉलीवूड हिरो-हिरोइन्सच्या पाठोपाठ मराठी कलाकारांना मिळाली आहे. - सोनाली कुलकर्णी

CNX Focus :
milan.darda@lokmat.com