गेल्या काही दिवसांपासून विविध पोस्टर, टीझर आणि मोशन पोस्टर रिलीज करून प्रेक्षकांमध्ये ‘काबील’ चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण करण्यात येत आहे. मंगळवारी रात्री उशिरा सिनेमाचे पहिले ट्रेलर इंटरनेटवर दाखल झाले असून या प्रजासत्ताक दिनाला हृतिकची जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार असे दिसतेय.
‘काबील’मध्ये हृतिक ‘रोहन भटनागर’ नावाच्या अंध व्यक्तीची भूमिका साकारत असून यामी गौतमी त्याची अभिनेत्री आहे. या दृष्टीहीन जोडप्याच्या प्रेमकहाणीमध्ये सर्व काही सुरुळीत चालू असताना अशी काही घटना घडते की, बदला घेण्यासाठी रोहनचा लढा सुरू होतो.
रोहित रॉय व्हिलनच्या भूमिकेत असून त्याचा भाऊ रोनित रॉयसुद्धा चित्रपटात दिसणार आहे. राकेश रोशन निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ता तर संगीत राजेश रोशन यांनी दिले आहे. पुढच्या वर्षी २६ जानेवारी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची टक्कर शाहरुख खानच्या ‘रईस’सोबत होणार आहे.
‘मोहेंजोदडो’चे अपयश पचवून या चित्रपटाद्वारे हृतिक पुन्हा एकदा फॉर्ममध्ये येतो का याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. तसे पाहिले गेले तर जानेवारी महिना त्याच्यासाठी लकी आहे. कारण त्याने पदार्पण केलेला ‘कहो ना प्यार है’ जानेवारी महिन्यातच प्रदर्शित झाला होता.
यंदा अक्षयच्या ‘रुस्तम’शी दोन हात करून हृतिकला चांगलीच चपराक बसली. व्यवसायिक तज्ज्ञांच्या मते, तुर्तास तरी त्याने ‘रईस’शी बॉक्स आॅफिसवर होणारा संघर्ष टाळायला हवा होता. विशेष म्हणजे दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांमध्ये तोडगा काढण्यासाठी चर्चासुद्धा झाली; पण त्याला यश आले नाही. आता याचा शेवट कोणासाठी गोड होणार हे तर चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कळेलच.
तोपर्यंत तुम्ही या ट्रेलरचा आनंद लुटा आणि आम्हाला कळवा तुम्हाला कसा वाटला हृतिकचा ‘काबील’.