बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. विवेक अग्निहोत्री त्यांच्या सिनेमामुळे नाही तर एका वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. "वरण भात म्हणजे गरीबांचं जेवण" असं ते म्हणाले होते. या वक्तव्यानंतर त्यांना चांगलंच ट्रोल केलं गेलं होतं. काही मराठी सेलिब्रिटींनीही विवेक अग्निहोत्रींना सुनावलं होतं. त्यानंतर आता विवेक अग्निहोत्रींनी या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेल्याचं म्हटलं आहे.
विवेक अग्निहोत्रींनी त्यांच्या आगामी बंगाल फाइल्स निमित्त द रौनक पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला गेल्याचं सांगितलं. ते म्हणाले, "एका ठिकाणी मी मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत मी गमतीत म्हणालो की मी जेव्हा दिल्लीहून मुंबईला गेलो होतो. तेव्हा पल्लवी जी महाराष्ट्रीयन आहे तिने मला वरण भात खाऊ घातला. त्यात मीठही कमी होतं. तर मी दिल्ली स्टाइलमध्ये म्हटलं की अरे हे काय मी गरीबांचं खाणं खाऊ? पण, त्यानंतर मी हेही म्हणालो होतो की जसं मला अक्कल आली तेव्हा समजलं की भारतात महाराष्ट्रीयन फूड हे सगळ्यात हेल्दी आहे. जे मी खूप आवडीने खातो. वरण भात माझं आवडतं खाणं आहे".
"आता काही लोकांनी काय केलं की सुरुवातीचं वाक्य उचललं. महाराष्ट्रच्या अन्नाला गरीबांचं खाणं म्हटलं. याला पकडून मारा...त्यामुळे मला कोणत्याच वादात अडकायचं नाही. आजकाल लोक एडिट करतात", असंही विवेक अग्निहोत्री पुढे म्हणाले.
काय म्हणाले होते विवेक अग्निहोत्री?
एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्री त्यांची मराठमोळी पत्नी पल्लवी जोशीसोबत सहभागी झाले होते. या मुलाखतीत त्यांनी मराठी खाद्यसंस्कृतीबद्दल भाष्य केलं. पल्लवीने लग्नानंतर करून दिलेल्या वरण-भात आणि कढीला त्यांनी नावं ठेवली होती. हे सांगताना ते म्हणाले होते की मला वाटलेलं मराठी जेवण म्हणजे मस्त तूप वगैरे घालून असेल. पण, हे तर शेतकऱ्यांसारखं गरीब खाणं झालं.