Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 06:51 IST

Asha Bhosle News: ज्येष्ठ पार्श्वगायिका आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शनिवारी संध्याकाळी दाखल करण्यात आले आहे. 

मुंबई - ज्येष्ठ पार्श्वगायिका आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शनिवारी संध्याकाळी दाखल करण्यात आले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना छातीचा संसर्ग झाल्याने हृदयावर ताण येऊन घरीच हृदयविकाराचा झटका आला. काही वेळ त्या बेशुद्धास्थेत होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.  तेव्हा त्यांची प्रकृती चिंताजनक होती. सुरुवातीला त्यांना सीपीआर देण्यात आला. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. इंटर्नल मेडिसीनतज्ज्ञ डॉ. प्रतीत समदानी आणि हृदयविकार तज्ज्ञांचे पथक त्यांच्यावर उपचार करीत आहे.

काही महिन्यांपासून आशा भोसले यांची प्रकृती ठीक नसल्याने त्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात जात होत्या. तथापि, शनिवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती अचानक गंभीर झाली.  त्यांना रुग्णालयात दाखल करताना त्यांच्या सोबत सून आणि नात जनाई भोसले होत्या, असे सूत्रांनी सांगितले. आशा भाेसले यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून त्या लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी प्रार्थना केली जात आहे.

नात जनाई यांचे आवाहन   जनाई यांनी ‘एक्स’वरील संदेशात म्हटले आहे की, माझी आजी, आशा भोसले यांना अत्यंत थकवा आणि छातीत संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करावा, ही नम्र विनंती. उपचार सुरू असून सर्व काही लवकरच सुरळीत होईल, अशी आशा आहे. आम्ही तुम्हाला सकारात्मक माहिती देऊ.

आशाताईंच्या प्रकृतीबद्दल कळताच राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी सायंकाळी रुग्णालयात डॉक्टरांची भेट घेत त्यांची प्रकृती आणि उपचारांबाबत माहिती घेतली. तसेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शनिवारी रात्री महाबळेश्वरला होते, ते सकाळी लवकर मुंबईसाठी रवाना होतील, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

संगीत विश्वातील प्रेरणा: आशा भोसले या भारतीय चित्रपट संगीतातील अत्यंत बहुमुखी व प्रभावशाली आवाज म्हणून ओळखल्या जातात. पाच दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ अशा विविध भाषांमध्ये हजारो गीते गायली आहेत.  रोमँटिक, गझल, पॉप, कॅबरे ते शास्त्रीय अशा सर्व प्रकारच्या संगीतावर त्यांनी आपली छाप उमटवली आहे. संगीतकार ओ. पी. नय्यर, आर. डी. बर्मन यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष गाजली.

English
हिंदी सारांश
Web Title : Asha Bhosle hospitalized with heart issues; condition critical but stable.

Web Summary : Legendary singer Asha Bhosle was hospitalized in Mumbai after a heart attack due to a chest infection. Her condition was initially critical, requiring CPR and ventilator support. Doctors are closely monitoring her. Family requests privacy and shares that treatment is ongoing with hopes for a full recovery.
टॅग्स :आशा भोसलेमुंबई