बॉलिवूड स्टार वरूण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ या सिनेमाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहे. तूर्तास चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’चा दमदार ट्रेलर रिलीज झालाय. डान्स फ्लोरवर भारत-पाक यांच्यातील मुकाबला या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये त्याची एक छोटीशी झलक पाहायला मिळते.
चित्रपटाचा ट्रेलर इतका कलरफुल आणि इमोशनल आहे की, सोशल मीडियावर आत्तापासूनच ‘ब्लॉकबस्टर फिल्म’ अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. चाहते ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ च्या ट्रेलरची प्रशंसा करताना थकत नाहीयेत. ट्रेलरमध्ये डान्सचा तडका आहे. नोरा फतेहीच्या किलर मुव्ह्स आहेत. शिवाय प्रभुदेवाच्या डान्सची झलकही आहे. वरूण व श्रद्धाची केमिस्ट्री नेहमीप्रमाणे मस्त जमून आलीय.
वरूण धवन-श्रद्धा कपूर स्टारर ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ रेमो डिसूजा दिग्दर्शित करतोय. रेमोचा हा डान्स बेस्ड चित्रपट ‘एबीसीडी’ या सुपरहिट फ्रेंचाइजीचा तिसरा भाग आहे. आधी या चित्रपटाचे नाव ‘रुल ब्रेकर्स’ असे असल्याचे सांगितले गेले. मात्र आता ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ या नावाने हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. श्रद्धा व वरूणसोबत नोरा फतेही ही सुद्धा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’मध्ये वरुण एका पंजाबी तरुणाची भूमिका वठविणार असून श्रद्धा एका पाकिस्तानी डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे.