Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुमची जबाबदारी घ्यायला मी राजकीय व्यक्ती नाही'; मुलांना बिघडवण्याचा आरोप करणाऱ्या महिलेला उर्फीचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 08:41 IST

Urfi Javed: एका महिलेने उर्फीवर 'तुझ्यामुळे मुलं बिघडतात', असा आरोप केला आहे.

चित्रविचित्र फॅशन करुन चर्चेत येणारी उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या स्पष्टवक्तेपणा आणि सडेतोड भाष्य यांमुळेही कायम चर्चेत येत असते. आतापर्यंत उर्फीच्या फॅशनसेन्सवर अनेकांनी बोट उचचलं आहे. अगदी सामान्यांपासून दिग्गजांनी तिच्या फॅशनसेन्सची खिल्ली उडवली आहे. तर, काहींनी घणाघाती टीकाही केली आहे. परंतु, या सगळ्यांना उर्फी पुरून उरली. यावेळीदेखील काही महिलांनी तिच्यावर थेट 'तू मुलांना बिघडवतेस', असा आरोप केला आहे. या महिलांनाही उर्फीने त्यांच्याच शब्दांमध्ये उत्तरं दिलं.

अलिकडेच उर्फी 'इंडिया टुडे'च्या कॉनक्लेवमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिला उपस्थितांनी काही प्रश्न विचारले.मात्र, खोचकपणे विचारलेल्या प्रश्नांची उर्फीने तिच्या स्वभावाप्रमाणेच थेट उत्तरं दिली. 'उर्फी तुझ्यामुळे माझ्या लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतोय', अशी तक्रार एका महिलेने केली. त्यावर "तुमची मुलं आहेत ना, तुम्ही त्यांना जन्म दिलाय. त्यामुळे ते कोणामुळे बिघडत असतील असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्याची गरज आहे. त्याचा दोष मला का देताय?", असं उर्फी म्हणाली.

आणखी एका महिलेने अशाच प्रकारचा प्रश्न विचारला. त्यावर,  "जेव्हा तुम्ही तुमच्या पतीकडून मार खाता तेव्हा ते उदाहरण मुलांसमोर चांगलं असतं का? त्यामुळे ती काही माझी मुलं नाहीत मी त्यांची जबाबदारी घ्यायला. आणि, मी कुणी राजकीय व्यक्ती सुद्धा नाही जी तुमची जबाबदारी घेईन. मी मनोरंजन क्षेत्रात काम करते. त्यामुळे जे माझं काम आहे तेच मी करते", असं सडेतोड उत्तर उर्फीने दिलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उर्फीने सोशल मीडियावर काही फोटो टाकत तिने एका मिस्ट्री मॅनसोबत साखरपुडा केल्याचं जाहीर केलं. तिच्या या फोटोनंतर सोशल मीडियावर एकाच चर्चेला उधाण आलं. परंतु, या फोटोमागील सत्यता अजूनही समोक आलेली नाही. त्यामुळे उर्फीने खरंच साखरपुडा केलाय की, एखाद्या प्रोजेक्टचा भाग आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

टॅग्स :उर्फी जावेदबॉलिवूडसेलिब्रिटी