ट्विंकल खन्ना ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री. मेला, बादशाह, बरसात, जोरू का गुलाम, जोडी नंबर १ अशा सिनेमांमधून तिने एक काळ गाजवला. लग्नानंतर जरी ट्विंकल अभिनयापासून दूर गेली तरी ती आजही तिचं फॅन फॉलोविंग तितकंच आहे. ट्विंकल सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. नुकतंच ट्विंकल खन्नाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. पण, हा व्हिडीओ शेअर करत तिने स्वत:चीच खिल्ली उडवली आहे.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओला ट्विंकलने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "माधुरी बनण्याच्या नादात मी संजय दत्त दिसतेय", असं म्हणत ट्विंकलने स्वत:चीच खिल्ली उडवली आहे. पुढे ती म्हणते, "ही डान्स स्टेप करण्याच्या नादात मी लॉकडाऊनमध्ये स्वत:चाच पाय फ्रॅक्चर करुन घेतला होता. तुम्हाला वाटतं की तुम्ही त्या व्यक्तीसारखे डान्स करता पण रिअॅलिटी वेगळीच असते".
ट्विंकल खन्नाच्या या व्हिडीओवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. अक्षय कुमारनेही पत्नीच्या या व्हिडीओवर मजेशीर कमेंट केली आहे. "टॅलेंट -प्रश्नात्मक, आत्मविश्वास- दृढ, बायको- अत्यंत मौल्यवान", असं अक्षयने कमेंटमध्ये म्हटलं आहे. मराठी अभिनेत्री स्पृहा वरदनेही "कूल कॅप्शन", अशी कमेंट केली आहे. ट्विंकल खन्नाचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.