Join us  

सलमान खान घेणार इंडस्ट्रीतून निवृत्ती? 'टायगर 3' सिनेमातील 'या' 5 गोष्टी आहेत त्याचा संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 1:11 PM

Tiger 3: सलमानच्या निवृत्ती घेण्याविषयीचे या सिनेमात कोणते ५ संकेत आहेत ते जाणून घेऊयात.

बॉलिवूडचं दबंग अभिनेता सलमान खान याचा टायगर 3 (tiger 3) हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. त्यामुळे सलमान सध्या चांगलाच चर्चेत आहे. आतापर्यंत सलमानने बॉलिवूडमध्ये असंख्य सुपरहिट सिनेमा दिले. विशेष म्हणजे वयाची पन्नाशी पार केल्यानंतरही त्याचा उत्साह आणि अॅक्शन सीन करण्याचं कसब कायम आहे. परंतु, टायगर ३ नंतर सलमान निवृत्ती घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर या सिनेमातूनदेखील असेच काही संकेत देण्यात आल्याचीही चर्चा सध्या नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे. म्हणूनच, सलमानच्या निवृत्ती घेण्याविषयीचे या सिनेमात कोणते ५ संकेत आहेत ते जाणून घेऊयात.

१. सौम्य अॅक्शन सीन-

सलमान खान म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर त्याच स्टंटबाजी, खतरनाक अॅक्शन सीन हेच येतं. परंतु, टायगर ३ मध्ये सलमानचे अत्यंत सौम्य अॅक्शन सीन असल्याचं म्हटलं जात आहे. टीझर आणि ट्रेलरमध्ये सुद्धा सलमानचे फारसे अॅक्शन सीन दिसून आले नाही. त्यामुळे त्याच्या वाढत्या वयाचा परिणाम त्याच्या अॅक्शन सीनवर झाल्याचं दिसून येत आहे. तसंच सलमानपेक्षा यावेळी सिनेमात कतरिनाचे जास्त अॅक्शन सीन चित्रीत झाले आहेत.

२. सलमानचा वावर तुलनेने मोजकाच-

या सिनेमात सलमान जरी मुख्य भूमिकेत असला तरीदेखील त्याचा वावर फारसा लक्षवेधी ठरला नाही. सिनेमात तो कुठे तरी बॅक स्टेजला गेला.  त्याच्यापेक्षा इमरान हाशमीच्या भूमिकेला जास्त महत्त्व देण्यात आलं. त्यामुळे या सिनेमात जोया फ्रंट सीटवर दिसला. तर, टायगर बॅक सीटवर गेल्याचं जाणवतं.

३. टायगरमध्ये पठाणची एन्ट्री -

शाहरुख खानच्या पठाणमध्ये सलमान खान एन्ट्री घेऊन हा सिनेमा गाजवून सोडला होता. परंतु, टायगरमध्ये शाहरुखने एन्ट्री घेऊनही फारसा फरक पडला नाही. शाहरुखचे या सिनेमातील अॅक्शन सीन फिके पडले. तो अॅक्शन सीन करत असताना त्याच्या चेहऱ्यावर थकवा पूर्णपणे दिसून येत होता. त्यामुळे या सिनेमात त्याचा कॅमिओ रोल सपशेल फेल ठरला आहे.

४. पठाण आणि टायगर ३ ची स्टोरी जवळपास सारखीच-

टायगर ३ आणि पठाण या सिनेमाच्या कथानकामध्ये फारसा फरक नाही. बॉलिवूडमध्ये एखाद्या सिनेमात कॅमियो रोल करणं म्हणजे एखाद्याचं करिअर वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न असतो असं म्हटलं जातं. तसंच काहीसं या सिनेमात होताना दिसलं. पठाण आणि टायगर ३ च्या कथानकात फारसा फरक न दिल्यामुळे सलमानच्या सिनेमात काही ग्रेट असं नवीन पाहायला मिळतं नाही.

५. सिनेमातील म्युझिक -

या सिनेमातील गाणी अरजीत सिंहने गायली आहेत. मात्र, ही गाणी सुद्धा प्रेक्षकांवर फारसा प्रभाव पाडत नाहीत. त्यामुळे या सिनेमाची निर्मिती करताना लहान लहान गोष्टींकडे निर्माते वा अन्य कोणीही फारसं गांभीर्याने न पाहिल्याचं दिसून येत आहे. इतकंच नाही तर हा सिनेमा करताना सलमानही फारसा गंभीर नव्हता अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे या सिनेमानंतर सलमान निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे की कायय़ किंवा इंडस्ट्रीतून बाहेर पडायचं यासाठीच सलमानने या सिनेमाकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही की काय? अशा चर्चा आता प्रेक्षकांमध्ये रंगू लागल्या आहेत. परंतु, निवृत्तीविषयी सलमानने किंवा त्याच्या टीमकडून कोणीही काही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे या केवळ चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगल्या आहेत.

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडसिनेमाशाहरुख खान