आमिर खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे अनेक लूक पोस्टर जारी केले गेले आहेत. अमिताभ बच्चन आणि फातिमा सना शेखनंतर आज या चित्रपटाचा तिसरा टीजर लूक जारी केला गेला. हा लूक आहे, जॉन क्लाईवचा. आमिर खाने आपल्या सोशल अकाऊंटवर हा लूक जारी केला आहे. या तिस-या लूकसोबतचं ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’च्या कथेबद्दल अंदाज बांधला जात आहे. जॉन क्लाईवचे पात्र ब्रिटीश इंडियाचा अधिकारी स्टीमनवर आधारित असावे, असे मानले जात आहे. आमिर व अमिताभच्या या चित्रपटाची कथा ठग आणि इंग्रजांच्या संघर्षावर आधारित असेल, असा कयास बांधला जात आहे. चित्रपटातील ‘ठग्स’ ईस्ट इंडिया कंपनीविरोधात लढणा-या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या रूपात दिसतील, असाही एक अंदाज आहे.
यादरम्यान ईस्ट इंडिया कंपनीचे अनेक कर्मचारी अचानक गायब व्हायला लागले होते. यामागे ठगांचा हात आहे, असे समजून ईस्ट इंडिया कंपनीने या ठगांचे रहस्य जाणून घेण्यासाठी एका इंग्रज अधिका-याला भारतात पाठवले होते. त्या अधिका-याचे नाव होते, हेन्री स्लीमन. स्लीमन भारतात आल्यावर ठगांची टोळी आहे, असे त्याला कळले होते. या टोळीच्या म्होरक्याचे नाव बेहराम ठग असल्याचेही त्याने शोधून काढले आणि त्याला पकडलेही. याकाळात कर्नल स्लीमनने सुमारे १४०० ठगांना फासावर लटकवले होते. १८२० ते १८३० या काळात चार हजारांच्यावर ठग गुन्हेगारांना अटक करण्यात आली. या अटकसत्रात भाग घेतलेले एक ब्रिटिश अधिकारी म्हणजे कर्नल मेडोज टेलर. त्याची निजामाचे राज्य, व-हाड प्रांत व नर्मदेच्या खो-यातील प्रदेशात कॅप्टनपासून कर्नलच्या हुद्द्यापर्यंत नोकरी झाली होती. त्यावेळी त्याने ठगांच्या गुन्हेगारीचा अभ्यास केला. अटक केलेल्या ठगांच्या कबुलीजबाबातून अनेक धक्कादायक, अमानुष कहाण्या उलगडत गेल्या. त्यांचा प्रभाव पडलेल्या कर्नल टेलरने १८६० मध्ये निवृत्त होऊन मायदेशी इंग्लंडला परतल्यानंतर ‘कन्फेशन्स आॅफ ए ठग’ हे पुस्तक लिहिले.